पुणे: कोरोना महामारीच्या काळात साथीचा फैलाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. या उद्देशाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गरीब आणि गरजू लोकांच्या लसीकरणासाठी श्री मंगेश व्हॅक्सिन फंडची निर्मिती केली आहे. त्याअंतर्गत एका दिवसात १०० ते २०० लाभार्थ्यांना मोफत लस दिली जाणार आहे. अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
मध्यंतरी पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली होती. लसीकरण सुरू असूनही संख्येत घट झाली नाही. सद्यस्थितीत सक्रिय रुग्णांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. तर दुसऱ्या बाजूने लसीकरण मोहिम सुरु आहे. लसींचा तुटवडा सध्या तरी जाणवत आहे. पण जशी लस उपलब्ध होईल. तसे नागरिक लस घेत आहेत. अशाच परिस्थितीत सरकारने महापालिका रुग्णलयावर ताण येऊ नये. म्हणून रुग्णालयाला लसीकरणाची परवानगी दिली आहे. त्यांनी त्यांचे दरही निश्चित केले आहेत. सामान्य माणूस दर पाहून लसीकरणापासून वंचित राहू नये. म्हणूनच या उपक्रमाला सुरुवात केली आहे.
घरकाम करणारे कर्मचारी, फेरीवाले, भाजी - फळे असे किरकोळ विक्रेते, रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी, हातगाडी आणि रिक्षावाले, गरजू व्यक्ती अशांनाच या मोफत लसचा लाभ घेता येणार आहे. असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे