पुणे : स्वातंत्र्य मिळाले चांगलेच आहे, पण आम्हाला आता भूकेपासूनही स्वातंत्र्य हवे आहे, अशी आर्त मागणी लोकायत संस्थेने आयोजित केलेल्या ‘माझे रेशन माझा हक्क’ या मोहिमेत केली.
स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनापासून लोकायतच्या वतीने शहरातील वस्त्यांमध्ये अशी शिबिरे होणार आहेत. गंजपेठमध्ये झालेल्या पहिल्याच शिबिरात अनेक गरीब कुटुंबातील स्त्री पुरुषांनी रेशनबाबत आपल्या व्यथा मांडल्या.
नवऱ्याच्या अंगठ्याच्या ठशावर रेशनिंगचे धान्य मिळायचे, त्याचे निधन झाले, तुमचा ठसा चालणार नाही, असे सांगितले जात असल्याने वर्ष झाले, रेशनचे धान्य मिळत नाही, अशी तक्रार एका धुणीभांडी करणाऱ्या महिलेने केली.
शिबिरात अन्न सुरक्षा कायदा २०१३, रेशनच्या सार्वत्रिकीकरणाची गरज, यासंबंधीच्या तमिळनाडू मॉडेलची लोकांना माहिती देण्यात आली.
लोकायत नागरी समिती पुढील वर्षभर पुण्यातील विविध वस्त्यांमध्ये लोकांच्या रेशनसंबंधी तक्रारी सोडविण्यासाठी आणि ‘मागेल त्याला रेशन’ या मागणीसाठी ‘माझे रेशन, माझा हक्क’ अभियान राबविण्यात येणार आहे अशी माहिती अॅड. मोनाली चं. अ. यांनी दिली. कुमार जाधव, नीलेश जगताप, प्रतीक, सागर यांनी संयोजन केले.