पुणे : महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत योग्य प्रक्रिया पार न पाडता झाडे तोडण्याच्या २५० अर्जांस परवानगी दिल्याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप व वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष अशोक घोरपडे यांचा पगार गोठविण्यात यावा तसेच त्यांच्यावर फौजदारी कारवाई सुरू करावी, असा आदेश हरित लवादाने दिला.महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक घेऊन राजेंद्र जगताप व अशोक घोरपडे यांनी झाडे तोडण्याच्या २५० अर्जांस शनिवारी परवानगी दिली होती. ही झाडे तोडण्यास वृक्षप्रेमी संस्थेचे नंदकुमार गोसावी व विनोद जैन यांनी आक्षेप घेतला होता. या आक्षेपावर सुनावणी न घेता वृक्ष तोडण्यास परवानगी देण्यात आल्याची तक्रार गोसावी व जैन यांनी हरित लवादाकडे केली होती. त्यांच्या अर्जावर तातडीने सुनावणी घेत हरित लवादाचे न्यायाधीश व्ही. आर. किनगावकर व अजय देशपांडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. वृक्ष तोडण्यासाठी न्यायालयाने विहित करून दिलेली प्रक्रिया त्यांनी पार न पाडल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे लवादाने स्पष्ट केले आहे. अर्जावर सुनावणी घेताना त्यांनी महापालिकेच्या वतीने बाजू मांडली जाण्यापूर्वी कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १ फेब्रुवारी २०१६ रोजी ठेवण्यात आली आहे.आयुक्तकुणाल कुमार परदेश दौऱ्यावर असल्यामुळे वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी घेतली होती. वृक्षतोडीसाठी प्रामुख्याने बांधकाम व्यावसायिकांचे अर्ज आले होते. प्राधिकरण समितीच्या अनेक बैठका तहकूब झाल्याने हे अर्ज प्रलंबित होते.
अतिरिक्त आयुक्तांचा पगार गोठवा
By admin | Published: January 22, 2016 1:55 AM