पुणे : उन्हाचा चटका वाढलेला असला तरी गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी फळभाज्यांची आवक स्थिर राहिली. असे असले तरी गवार, भेंडी, टोमॅटो, दुधीभोपळा या भाज्यांचे भाव उतरले. तर कोबी, गाजर, ढोबळी मिरची, हिरवी मिरची, कारली या भाज्यांचे भाव तेजीत राहिले. पालेभाज्यांची आवक मात्र काही प्रमाणात कमी होत असल्याने भाव तेजीत आहेत.मार्केट यार्डात रविवारी १७० ते १८० ट्रक इतकी भाज्यांची आवक झाली. त्यामध्ये परराज्यांतून प्रामुख्याने हिमाचल प्रदेशमधून ३ ट्रक मटार, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ५ ते ६ टेम्पो शेवगा, कर्नाटक आणि गुजरातमधून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटकातून ७ ते ८ टेम्पो तोतापुरी कैरी आणि गुजरात व कर्नाटकातून ३ ते ४ ट्रक कोबीची आवक झाली.स्थानिक भागातून सातारी आल्याची १२०० ते १४०० गोणी, टॉमेटोची ५.५ ते ६ हजार पेटी, फ्लॉवर १४ ते १५ टेम्पो, कोबी १० ते १२ टेम्पो, शेवगा ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, गावरान कैरी ८ ते १० टेम्पो तर कांद्याची १०० ट्रक आवक झाली. आग्रा, इंदूर, तळेगाव येथून बटाट्याची ४५ ते ५० ट्रक, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची ५ ते ५.५ हजार गोणी आवक झाली.पालेभाज्यांची आवक कमी होत असल्याने कोथिंबीर, मेथी या भाज्यांचे भाव तेजीत आहेत. रविवारी कोथिंबिरची १ लाख २५ हजार जुडी तर मेथीची सुमारे ५० हजार जुडी आवक झाली. कोथिंबिरीला शेकडा जुडीमागे ७०० ते १५०० आणि मेथीला ५०० ते १ हजार रुपये भाव मिळाला. (प्रतिनिधी)
फळभाज्यांची आवक स्थिर
By admin | Published: April 24, 2017 4:35 AM