पुणे : एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर कडक निर्बंध लावल्याने राज्य परिवहन महामंडळाला रोजचा २२ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. प्रवासी वाहतूक जरी बंद असली तरी एसटी महामंडळाने आपले लक्ष माल वाहतुकीवर केंद्रित केले. आतापर्यंत राज्यात एसटीचे माल वाहतुकीसाठी ८२ हजार ४०० फेऱ्या झाल्या आहेत. यातून एसटीने जवळपास १ कोटी २० लाख किमी वाहतूक केली आहे. यातून एसटीला ५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
मागील वर्षापासून एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. आर्थिक नुकसान काही प्रमाणात कमी व्हावे म्हणून एसटीने राज्यात २१ मे २०२० पासून मालवाहतूक सुरू केली. मालवाहतुकीत पुणे विभाग अनेकदा आघाडीवर राहिला आहे. जवळपास ८०० प्रवासी गाड्याचे रूपांतर मालवाहतुकीच्या गाडीत केले. एका गाडीची क्षमता जवळपास १० टन मालांची वाहतूक करण्याची आहे. पुण्याहून चंद्रपूर, नांदेड, मुंबई, यवतमाळ, कोल्हापूर, सोलापूर, वर्धा आदी शहरांसाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक झाली. यात अन्न धान्यापासून, अन्य वस्तूचा देखील समावेश आहे.