बारामती: बारामती-भिगवण रस्त्यालगतच्या सेवारस्त्याला रेल्वे प्रशासनाने कोणाताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे बुधवारी नगर परिषदेने आक्रमक भूमिका घेत रेल्वेच्या मालधक्क्याकडे जाणारा रस्ताच बंद करून टाकला. रस्ता बंद झाल्याने सेवारस्त्यासह रेल्वे मैदानावर मालट्रकच्या रांगा लागल्या होत्या.
बारामती शहरातील भिगवण रस्ता शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता मानला जातो. त्यामुळे या मार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या देखील तुलनेने अधिक आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून सेवारस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रेल्वेसह काही परिसर वगळता हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या कामाला परवानगी न दिल्याने रेल्वे प्रशासनानेच या सेवा रस्त्याच्या पूर्णत्वाला ‘खो’ घातल्याचे चित्र आहे. समांतर सेवा रस्ता करण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. मात्र, हे काम पूर्ण होण्यासाठी रेल्वे प्रशासनाची भूमिका महत्वाची आहे. भिगवण रस्त्यावरील या अवजड वाहनांचा धोका विचारात घेता नागरिकांच्या सुरक्षिततेस्तव नगरपालिकेने ट्रकचा मालधक्क्याकडे जाणारा रस्ताच बंद करून टाकल्याचा नगर परिषदेचा दावा आहे.
बारामती नगर परिषदेचे गटनेते सचिन सातव म्हणाले की, भिगवण रस्त्यालगतच्या सेवारस्त्यासाठी नगर परिषद प्रशासन रेल्वे प्रशासनाला विनंती करत आहे. आम्हाला त्यांच्या जागेची मालकी नको, त्यांची आडमुठेपणाची भूमिका आहे. रेल्वेसाठी नगर परिषदेने ‘आरओबी’बांधला. तांदुळवाडीत ‘आरयूबी ’बांधतोय, त्यासाठी आपण २५ ते ३० कोटी रुपये खर्च केले आहेत. मालधक्क्यामुळे रेल्वेची अवजड वाहतूक रस्त्यावर येते. त्याचा विद्यार्थी, महिलांना त्रास होतो. त्यामुळे गंभीर अपघात झाले आहेत. त्यासाठी रेल्वे प्रशासनाला आपण सेवा रस्त्याला परवानगी देण्याबाबत परवानगी मागत आहोत. मालधक्क्यामुळे येथील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. रेल्वे प्रशासनाने त्यांच्या वाहतुकीचा प्रश्न त्यांनीच सोडवावा. खासदार सुप्रिया सुळे यांनी आत्तापर्यंत तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, पियूष गोयल यांच्यासह विद्यमान रेल्वेमंत्र्यांना सेवारस्ता परवानगीबाबत पत्राद्वारे विनंती केली आहे. कोणीही मागणीला प्रतिसाद दिलेला नाही. रेल्वे प्रशासनाकडून नगर परिषदेला साडेसात कोटी रुपये भरण्याची मागणी होत आहे. एवढे पैसे भरून देखील मालकी रेल्वे प्रशासनाचीच राहणार असेल तर मालधक्का नसलेला चांगला, अशी नगर परिषदेची भूमिका आहे. तुमचे उत्पन्न चालू, मात्र आमच्या नागरिकांच्या सुरक्षिततेचे काय, जोपर्यंत निर्णय होणार नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही. नगर परिषद प्रशासन त्या ठिकाणी रात्रभर लोकांची नेमणूक करणार आहे. कोणाच्या पोटावर पाय देण्याचा हेतू नाही. मात्र, बारामतीकरांचा जीव धोक्यात घालून परवानगी देणार नसल्याचे सातव यांनी स्पष्ट केले.
याबाबत बारामती येथील रेल्वे प्रशासनप्रमुख आर. के. सिन्हा म्हणाले की, नगर परिषदेने मालधक्क्याच्या बंद केलेल्या रस्त्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कार्यालयाला कळविण्यात आली आहे. याबाबत स्थानिक पातळीवर कोणताही निर्णय घेतला जात नाही. सेवारस्त्यासह बंद केलेल्या रस्त्याबाबत देखील वरिष्ठ अधिकारीच निर्णय घेतील.
बारामती-भिगवण रस्त्यावरील मालधक्क्याचा रस्ता बारामती नगर परिषदेने बंद केला आहे.
१८०८२०२१ बारामती—०८