खड्डे मात्र जैसे थे;
लाखो रुपये पाण्यात
उंडवडी कडेपठार : जिरायत भागात सध्या एकच विषय चर्चेमध्ये आहे. तो म्हणजे बारामती-पाटस रस्त्यावरील खड्ड्यांचा. इतर सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत; पण या मार्गावरचे खड्डे वेगळे आहेत. बारामती-पाटस रस्त्यांवर सारखेच खड्डे पडतात ते अनेकदा बुजविलेही जातात मात्र पावसाळा आला की वेगळेच पाहायला मिळते. पहिल्या पावसातच रस्त्यांवरील खड्ड्यांतून डांबर बाहेर येते व रस्त्या अक्षरश: उखडला जातो. त्यामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे तयार होतात. ते खड्डे चुकविताना वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. या रस्त्यावर दररोज वाहन चालकांचे अपघात होत आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही हा रस्ता अपघातास निमंत्रण देणारा ठरत असल्याने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
मागील सहा महिन्यांपूर्वी या रस्त्याची डागडुजी तर काही ठिकाणी नवीन डांबरीकरण याचे काम झाले होते. या रस्त्यावर शासनाने लाखो रुपये खर्च केले. परंतु, या रस्त्याचे काम निकृष्ट झाले असल्याने सहा महिन्यांतच या रस्त्याची वाट लागली आहे. हा रस्ता बारामती येथून पाटस येथे पुणे-सोलापूर हायवेला मिळतो. बारामतीपासून ते पाटसपर्यंत मोरेवाडी, बऱ्हाणपूर, उंडवडी कडेपठार, जराडवाडी, उंडवडी सुपे, खराडवाडी, वासुंदे, रोटी तसेच इतर अनेक गावे या रस्त्यावर लागतात. बारामती तालुक्यात व एम.आय.डी.सी. ठिकाणी जाण्यासाठी हा रस्ता सदैव वर्दळीचा असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहन चालत आहेत. रात्रीच्या वेळी या रस्त्यावर येणारी नवीन वाहने काही ठिकाणी रस्ता चांगला असल्याने वाहन वेगात असते. परंतु त्यांना माहीत नसते की, या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. तेव्हा नवीन वाहनचालकांचे अनेक वेळा अपघात झालेले आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने दुचाकीवाल्यांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. गावातील नागरिकही आता रस्ता दुरुस्तीसाठी आक्रमक झाले आहेत.
---------------------------
सहा महिन्यांपूर्वी जवळपास गुंजखीळा ते उंडवडी कडेपठार पर्यंत नवीन डांबरीकरण झाले होते. बारामतीपर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी नवीन डांबरीकरणाचे पॅच टाकले होते. अवघ्या सहा महिन्यातच नवीन केलेला रस्ता खराडवाडी, उंडवडी सुपे या ठिकाणी पूर्णपणे खचला असून डांबर बाहेर येऊन मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. इतर अनेक ठिकाणी रस्त्या खचून खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे.
----------------------
फोटो ओळी : बारामती-पाटस रस्त्यावर सहा महिन्यांपूर्वी नवीन डांबरीकरण केलेल्या रस्त्याची दुरवस्था.
१००८२०२१-बारामती-०२
---------------------------