पुणे : रस्त्याने पायी जात असलेल्या तीन महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लांबविण्यात आल्याच्या तीन घटना कोथरूड आणि पर्वतीमध्ये घडल्या. यांतील दोन घटनांमध्ये मिळून चोरट्यांनी १ लाख ४५ हजारांचा ऐवज लांबवला. तर, तिसऱ्या घटनेत महिलेच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न असफल झाला.दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मित्र मंडळ चौकामध्ये संध्याकाळी पाचच्या सुमारास पहिली घटना घडली. मित्र मंडळ कॉलनीमधील छंदवंती बंगल्यासमोरून मैत्रिणीसह पायी जात असलेल्या सरिता उत्तम भुमकर (वय ६०, रा. चाळ क्र. ७१/७/अ पर्वती दर्शन) यांच्या गळ्यातील ऐवज चोरट्याने हिसकावला. मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ५० हजारांची सोनसाखळी आणि ३५ हजारांचे मंगळसत्र हिसकावून पोबारा केला. तर, कोथरूड येथील ताथवडे उद्यानाजवळ एका महिलेचे ६० हजारांचे अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावण्यात आल्याची दुसरी घटना संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली. या घटनेतील आरोपींचे सीसी टीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून, त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तर, डहाणूकर कॉलनीमधून पायी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा चोरट्यांचा प्रयत्न महिलेच्या सतर्कतेमुळे फसला. ही घटना सहाच्या सुमारास घडली. दोन्ही घटनांप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.(प्रतिनिधी)
शुक्रवारची संध्याकाळ सोनसाखळी चोरट्यांची
By admin | Published: January 31, 2015 1:03 AM