लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी येत्या शनिवार (दि.३) पासून नवे निर्बंध लागू करण्याचा निर्णय शुक्रवारी (दि.२) घेण्यात आला. यात सात दिवसांसाठी हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंद करण्याचा समावेश असल्याने हॉटेल व्यावसायिक संतापले आहेत. नुकत्याच सुरळीत होऊ पाहणाऱ्या व्यवसायावर सरकारने कुऱ्हाड मारली असल्याचे सांगत आजचा दिवस ‘काळा’ ठरल्याची संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली.
युनायटेड हॉस्पिटॅलिटी असोसिएशन या रेस्टॉरंट असोसिएशनने या निर्बंधांना विरोध केला. असोसिएशनचे उपाध्यक्ष अजिंक्य शिंदे म्हणाले, “मागील वर्षभरात लॉकडाऊनचा परिणाम म्हणून शहरातील ४० टक्के रेस्टॉरंट बंद झाली. जी सुरू आहेत त्यांचा व्यवसाय ५० टक्केही होत नाही. अशा स्थितीत आणखी ७ दिवस हॉटेल व रेस्टॉरंट पूर्ण बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय जाचक आहे.”
हॉटेल, रेस्टॉरंट बंदमुळे फक्त मालकच नाही तर या व्यवसायावर अवलंबून असलेले लाख कामगार बेकार होतील. त्यांची जबाबदारी सरकार घेणार आहे का? असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला. भाजीमंडई, अन्य सर्व दुकाने सुरू असतील, मग कोरोनाचा संसर्ग काय फक्त हॉटेल व रेस्टॉरंटमधूनच होतो का? याचे उत्तर प्रशासाने द्यावे, असे शिंदे म्हणाले. “गेले वर्षभर तोटा सहन करीत आम्ही व्यवसायात तग धरून आहोत. सरकारने घालून दिलेल्या प्रत्येक नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याची आमची तयारी आहे. मात्र आम्हालाही व्यवसाय करायची संधी द्यावी,” अशी मागणी संघटनेचे सचिव दर्शन रावल यांनी केली.