पुणे : हातउसने दिलेले पैसे मागितले म्हणून मित्राचा चाकूने भोसकून खून करीत तत्कालीन नगरसेवकावरही जीवघेणा हल्ला करणाऱ्यास न्यायालयाने जन्मठेपेसह एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. हिवसे यांनी हा निकाल दिला.
अमर रघुवीर बैसे (वय 38, रा. रामलींग रोड, पाबळ फाटा, ता. शिरूर) असे त्याचे नाव आहे. प्रशांत माळवे (वय 38, रा. शिरुर) असे मयत तरूणाचे नाव आहे. ही घटना 22 मार्च 2018 रोजी दुपारी एकच्या सुमारास शिरूर येथील डंबेनाला येथे घटली. याबाबत, सचिन धाडीवाल (वय 38, रा. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. याघटनेत, सचिन यांच्याही खुनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रशांत व अमर हे दोघेही मित्र आहेत. घटनेच्या तीन महिन्यापूर्वी सचिन यांच्या समक्ष प्रशांत याने अमर यास दहा हजार रुपये उसने दिले होते. मुदत उलटून गेल्यानंतर प्रशांत हा अमरकडे वारंवार पैशांची विचारणा करत होता. मात्र, तो टाळाटाळ करत असल्याचे प्रशांत यांनी सचिन सांगितले. त्यानंतर, सचिन यांनी अमर यास पैसे देण्यास सांगतो असे सांगितले. घटनेच्या दिवशी प्रशांत यांनी सचिन यांना संपर्क साधत अमर याच्याबरोबर डंबेनाला येथे थांबलो असल्याचे सांगितले. अमर यास समजावून सांगण्यासाठी येण्याचे प्रशांत यांनी सांगितले. घटनास्थळी आल्यानंतर प्रशांत हे रागाच्या स्वरात अमर याकडे पैशाची मागणी करू लागले. त्यानंतर, अमर याने खिशातील चाकू काढून प्रशांतच्या पोटात भोसकला. सचिन हे थांबविण्यासाठी गेले असता त्यांच्याही पोटात चाकू भोसकत अन्य ठिकाणी वार केले. यावेळी, तुला संपवून टाकतो म्हणत अमर याने प्रशांत यावर पुन्हा वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर, प्रशांत यांना घेऊन सचिनही दवाखान्यात दाखल झाले. उपचारादरम्यान प्रशांत यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी काम पाहिले. हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून त्यांनी आरोपीला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.