--
राजगुरुनगर: वाचन संस्काराने येणारी बहुश्रृतता जीवन समृद्ध करते. यासाठी सर्वांनीच पुस्तकांना आपल्या जगण्याचा भाग बनवून त्यांच्याशी मैत्री करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. व्ही.डी. कुलकर्णी यांनी केले.
हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात मराठी व ग्रंथालय विभागाच्यावतीने राष्ट्रीय वाचन दिनानिमित्त आयोजित 'चला वाचू या' उपक्रमाच्या ऑनलाईन उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे, उपप्राचार्य प्रा. एस. एन. टाकळकर, प्रबंधक कैलास पाचारणे आणि इतर अभिवाचक उपस्थित होते.
डॉ. कुलकर्णी म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या युगात जग जवळ आले असले तरी तरुण पिढी समाजमाध्यमांचा अतिरेकामुळे भोवतालपासून दुरावत अधिकाधिक स्वतःत गुंतत चालली आहे. अशा परिस्थितीत पुस्तकं आपल्याला जगाशी, भोवतालशी जोडून ठेवतील. त्यासाठी वाचनसंस्कार रुजविणे गरजेचे आहे.
उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे यांनी केरळमधील पुस्तक आंदोलनाचे जनक पी.एन. पैनिकर यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय वाचन दिनाचे, 'चला वाचू या' या उपक्रमाची पार्श्वभूमी सांगितली. वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी अभिवाचन कार्यक्रमाद्वारे उत्तमोत्तम साहित्य नव्या पिढीसमोर आणण्यासाठी मराठी विभागाच्या वतीने सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. 'वाचण्यासाठी शिका आणि शिकण्यासाठी वाचा' या मंत्रानुसार सर्वांनीच वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाळासाहेब अनुसे यांनी केले. ग्रंथपाल प्रा. पूनम तापकीर यांनी आभार मानले.
--
फोटो क्रमांक : १८
फोटो ओळ: हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात मराठी व ग्रंथालय विभागाच्या वतीने राष्ट्रीय वाचन दिन साजरा करण्यात आला.