निमित्त होते भावे प्राथमिकच्या १९८८ मधील स्कॉलरशिप बॅचच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘मैत्रभावे’ या स्मरणिकेच्या प्रकाशनाचे. १९८८ ची बॅच शिकत असताना शिकविणारे शिक्षक, भावे प्राथमिक शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापिका, तेव्हा ‘४ थी अ’ च्या वर्गात असलेले सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच त्यांचे कुटुंबीय यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन समारंभ आणि स्नेहमिलन कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाला भावे प्राथमिक शाळेतील अनघा खरे, वीणा नासिककर, विनीता पाटील, शलाका सोमण आणि यांच्यासह बारा निवृत्त शिक्षिका, शाळेचे मुख्याध्यापक अनिल खिलारे आणि उपमुख्याध्यापिका शोभा ताठे यांच्या हस्ते ‘मैत्रभावे’ या स्मरणिकेचे प्रकाशन केले. प्रभाकर भोसले यांनी स्मरणिकेचे कलासंपादन केले.
‘मैत्रभावे’ या स्मरणिकेत १९८८च्या ‘४ थी अ’च्या वर्गातील जवळपास २५ जणांनी लेख, कविता, चित्र आणि कार्टून्स यांच्या माध्यमातून योगदान दिले आहे.
१९८८च्या ‘४ थी अ’च्या वर्गातील विद्यार्थी गेल्या वर्षी कोविडकाळात व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकत्र आले. सर्वांनी स्मरणिका काढण्याचे निश्चित केले.
विद्यार्थ्यांच्या वतीने हर्षद सांगळे आणि प्राची काणे यांनी प्रत्यक्ष, तर श्रीरंग सहस्रबुद्धे आणि सौरभ पंचवाघ यांनी अमेरिकेतून ऑनलाईन मनोगत व्यक्त केले.
प्राची लोंढे-सहस्रबुद्धे यांनी सूत्रसंचालन केले, तर गीता पांडे-देशपांडे यांनी आभार मानले.
..................................
दप्तरातून स्मरणिका आणून प्रकाशन
नेहमीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने स्मरणिका प्रकाशन न करता आगळ्यावेगळ्या पद्धतीने केले. स्मरणिकेच्या प्रकाशनाची घोषणा झाल्यानंतर विक्रांत गोखले आणि प्राची काणे हे दोघे प्रेक्षकांमधून पाठीवर दप्तर घेऊन व्यासपीठावर गेले. जरीच्या कापडात बांधलेल्या स्मरणिका त्यांनी दप्तरातून काढल्या आणि मान्यवर शिक्षकांच्या हाती सोपविल्या. त्यानंतर स्मरणिकेचे प्रकाशन झाले.