यवत : जंगलात राहणारा आणि हुशार समजला जाणारा कोल्हा दिसल्यास अनेकांची भंबेरी उडते. मात्र, याच कोल्ह्याची कोल्हेकुई आता कासुर्डी (ता. दौंड) येथील ग्रामस्थांना नित्याची झाली आहे. जंगलात आढळणारा आणि झुंडीने राहणारा कोल्हा गावात माणसाळलेला आहे.कोल्ह्याच्या कावेबाजपणाच्या अनेक गोष्टी आपण लहानपणी पाठ्यपुस्तकातून वाचल्या आहेत. स्वत:ला खायला मिळावीत म्हणून इतरांना द्राक्षे आंबट असल्याचे सांगणारा कोल्हा कासुर्डीकरांना रोज सार्वसामान्य गावातील भटक्या कुत्र्यांबरोबर फिरताना दिसत असून ग्रामस्थांनी दिलेली भाकरी आवडीने खातात दिसत आहे. मागील एक ते दीड वर्षापासून सदर कोल्हा गावात राहात असून दिवसा आजूबाजूच्या ऊसाच्या शेतात तर रात्रीच्या वेळी गावात मानवी वस्तीत हक्काने चपाती खायला येत आहे. पुणे-सोलापूर महामागार्पासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या कासुर्डी गावठाणात कोल्ह्याचे वास्तव्य आहे. साधारणपणे एक वर्षपूर्वी नंदीवाले समाज कासुर्डी येथे उपजीविका करण्यासाठी आला असता त्यांनी त्यांच्या दारात येणाऱ्या कोल्ह्याला जीव लावण्यास सुरुवात केली. मात्र, काही काळानंतर नंदिवाले कुटुंब निघून गेले. मात्र, गावात कोल्ह्याने गावात रात्रीच्या वेळी हजेरी लावण्यास सुरुवात केली. गावातील लोकांना सुरुवातीला भीती वाटली,परंतु नंतर मात्र त्यांनी पाळीव कुत्र्याप्रमाणे चपाती टाकण्यास सुरुवात केल्यानंतर ग्रामस्थांना देखील त्याची आता सवय झाली आहे.विशेष म्हणजे कोल्हा आणि कुत्रे यांचे हाडवैर पाहायला मिळते. मात्र, गावातील कुत्र्यांनीदेखील कोल्ह्याबरोबर सलोखा निर्माण केल्याचे दिसते. कोल्हा हा जंगली व हिंस्र प्राणी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे तो कायम मानवी लोकवस्तीपासून अलिप्त राहणे पसंत करतो व लोकसुद्धा कोल्ह्यांच्या या स्वभावामुळे तो दिसला तरी घाबरून जातात. परंतु कासुर्डी गावातील लोकांनी कोल्ह्याला लावलेला लळा यामुळे त्यांच्या अंगातील हिंस्रपणा विसरला असून तो प्रेमाने व मायेने गावात येत आहे.>गेल्या वर्षभरापासून हा कोल्हा आमच्या गावात दिसत असून त्याचा कसल्याही प्रकारचा त्रास गावकºयांना नाही. उलट कासुर्डी ग्रामस्थ व हा कोल्हा यांचे एक नातेच निर्माण झाले आहे. मात्र कोल्ह्याच्या आवाजाला बाजूच्या वन हद्दीतून इतर कोल्ह्यांच्या आवाजाचा प्रतिसाद येत असल्याने आता वन विभागाने याची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.- मयूर सोळसकर, शामराव भोंडवे (ग्रामस्थ कासुर्डी)
कोल्ह्याशी दोस्ती करायचीय? या कासुर्डीत!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 2:37 AM