पुणे : सोशल मीडियावर मैत्री करुन तरुणीला प्रपोज केले. दोन वर्षे तिच्यासोबत रिलेशनमध्ये राहून तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर जातीवाचक शिवीगाळ करुन लग्नास नकार दिला. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन चंदननगर पोलिसांनी एका इसमावर बलात्कार व अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत ३१ वर्षीय तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून शिवराज सुभाषराव उंबरकर (रा. देवगाव, अंजनगाव, अमरावती) याच्यावर बलात्कारासह अॅट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२४ या कालावधीत चंदननगर आणि पीडित तरुणीच्या रूममध्ये घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी तरुणीची एप्रिल २०२२ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. आरोपीने मुलीसोबत मैत्री करुन प्रेमसंबंध निर्माण केले. शिवराज याने तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर दोघेजण रिलेशनमध्ये राहू लागले. रिलेशनमध्ये असताना आरोपीने तरुणीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, पीडितेने शिवराज याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली, असता त्याने फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ करुन लग्न करण्यास नकार दिला.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात जात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी शिवराज उंबरकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तापस सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख या करत आहेत.