पुणे : मित्रमंडळ येथील महापालिकेचा भूखंड बळकावण्याच्या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अखेर प्रशासनाने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात महापालिकेने आपल्या भूखंडाचे संरक्षण करण्यास आपण सक्षम असल्याचे स्पष्ट केले असून, अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कोठी करण्याची परवानगीही मागितली आहे.मित्रमंडळ चौकातील महापालिकेच्या मालकीचा सुमारे ८ एकरांचा भूखंड त्यावर अतिक्रमण करून बळकावण्याचा प्रकार मध्यंतरी झाला होता.हा भूखंड कमाल जमीन धारणा कायद्यानुसार महापालिकेकडे आला असून तशी कायदेशीर प्रक्रियाही महापालिकेने त्याच वेळी पूर्ण करून घेतली आहे. मात्र, तरीही मूळ मालक, त्याच्याबरोबर खरेदी व त्यानंतर न्यायालयीन दावे अशा प्रकरणात हा भूखंड अडकला होता. थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रत्येक स्तरावर निकाल महापालिकेच्या बाजूने लागला आहे.प्रॉपर्टी कार्डवरही संबंधिताने नाव लावून घेतले असल्याचे उघड झाले. त्यातही महापालिकेने कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर महापालिकेचेच नाव कायम केले गेले.दरम्यान, अतिक्रमणाच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्यात आली, त्या वेळी संबंधिताने आपण जागेवर काहीही हक्क सांगितलेला नाही; फक्त जागेच्या संरक्षणासाठी कुंपण घातले असल्याचे सांगितले. न्यायालयाने यावर महापालिकेला त्यांचे म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे सांगण्याचे आदेश दिले. त्यानुसार आता हे प्रतिज्ञापत्र दाखल केले असल्याची माहिती महापालिकेचे मुख्य विधी अधिकारी रवींद्र थोरात यांनी दिली.बागुल व जगताप यांनी या प्रतिज्ञापत्राबद्दल सांगितले, की त्यात काही त्रुटी आहेत. त्या त्वरित दूर केल्या पाहिजेत. संबंधिताने या जागेवरील फलक वगैरे काढले असल्याचे न्यायालयाला सांगितले.प्रत्यक्षात मात्र तिथे अजूनही फलक लावलेलेच आहेत. तसेच एकूण १०० झाडे तोडलेली असताना केवळ १३ झाडे तोडली, असेम्हटले आहे. यासंबधी महापालिकेच्या उद्यान विभागाने केलेल्याकारवाईचा उल्लेख नाही. हे बदल करावेत, अशी मागणी बागुलव जगताप यांनी केली.महापालिकेने आपल्या मालमत्तेची काळजी घेण्याची व्यवस्था करावी; अन्यथा त्या संदर्भात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मित्रमंडळ भूखंड; प्रतिज्ञापत्र दाखल, महापालिकेचा दावा बळकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 6:47 AM