कोथरूड : आमच्यातील बऱ्याच जणांनी केव्हाच पंचाहत्तरी ओलांडली आहे. पण शाळेमधील बालपणीच्या आठवणी मात्र अजूनही ताज्या आहेत. शरीर म्हातारं झालं म्हणून काय झालं, मन तर अजून टवटवीत आहे ना.... त्याला कारण आम्ही आमची मैत्री विसरलेलो नाही. आमची शाळा सोलापूर येथील. पण आम्ही आता दर वर्षी नियमितपणे पुण्यामध्ये भेटतो. आमच्या मेळाव्याचे हे सलग चौदावे वर्ष आहे, डी. जी. आठले रंगात येऊन सांगत होते. निमित्त होते कोथरूडमधील अंबर हॉलमध्ये भरलेल्या ह. दे. प्रशालेतील १९५९ च्या शालांत बॅचच्या चौदाव्या वार्षिक मेळाव्याचे. पुण्यातील मित्र-मैत्रीणींबरोबर सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर, मुंबई आदी भागांतून ६५ वर्गमित्र एकत्र आले होते. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता. हास्य विनोदात सर्वजण रंगले होते. मेळाव्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरुवात माधवी केळकर यांनी म्हटलेल्या सुश्राव्य गणेश वंदनेने झाली. प्रमुख पाहुण्या म्हणून खानापूरच्या सनवर्ल्ड वृद्धाश्रमाच्या रोहिणी पटवर्धन उपस्थित होत्या. त्यांच्या आणि काही ज्येष्ठ विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. एकपात्री कलाकार अभय खरे यांचा कार्यक्रम झाला. प्रकाश आठले यांनी सूत्रसंचालन, नीला भागवत यांनी प्रास्ताविक व पाहुण्याचे स्वागत केले व मनोहर भट यांनी आभार मानले.
संमेलनातून दोस्ती झाली घट्ट
By admin | Published: April 26, 2017 4:02 AM