- महेश जगताप
सोमेश्वरनगर (पुणे) : बारामती तालुक्यातील सोमेश्वर साखर कारखान्यात काम करणारे रामचंद्र किसन कोरडे व त्यांचे जिवलग मित्र अशोक गणपत होळकर या दोघांचे हृदयविकाराने निधन झाले. कारखान्यात जय-वीरु या नावाने प्रसिद्ध असलेली कोरडे-होळकर यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे रामचंद्र कोरडे (वय ४९) यांचे दि. १७ रोजी हृदयविकाराने निधन झाले. तर त्यांचे जिवलग मित्र अशोक होळकर (वय ५८) यांचे त्याच दिवशी सायंकाळी हृदयविकारानेच निधन झाले आहे. रामचंद्र कोरडे हे खंडोबाचीवाडी सोमेश्वर कारखान्यात कामाला येत होते तर अशोक होळकर हे होळ (पाटीलवाडा) येथून कारखान्यात कामाला येत होते. या दोघांच्या वयात नऊ वर्षांचा फरक असला तरी त्यांची जिगरी मैत्री सगळीकडे परिचित होती.
विशेष म्हणजे हे दोघे सोमेश्वर कारखान्यात एकाच दिवशी म्हणजे १९ ऑक्टोबर २००१ रोजी एकाच असिस्टंट फायरमन या पदावर रुजू झाले. त्यामुळे एकत्र काम, एकत्र जेवण, फिरायला एकत्र जाणे, सुखदुःखात एकाच वेळी सामील होणे यामुळे त्यांची मैत्री घट्ट होत गेली. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.