पुणे : वन्यजीव म्हटले की, वाघ, सिंह, हत्ती यांच्याकडे पाहिले जाते, त्यांचे संवर्धन करण्यासाठी अनेकजण पुढे येतात. पण निसर्गातील छोटे वन्यजीव देखील तितकेच महत्त्वाचे आहेत, हाच संदेश देण्यासाठी प्रसिध्द वन्यजीव छायाचित्रकार विजय बेदी यांनी ‘द सिक्रेट लाइफ ऑफ फ्रॉग्ज’ हा माहितीपट तयार केला. त्यातून बेडकाचा जीवनप्रवास उलगडला.
वन्यजीव सप्ताहानिमित्त वन विभाग आणि नेचर वॉक ट्रस्टतर्फे ‘एनएफआय’मध्ये ‘द सिक्रेट लाइफ ऑफ फ्रॉग्ज’चे स्क्रिनिंग करण्यात आले. याप्रसंगी वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, उपवनसंरक्षक (वन्यजीव) तूषार चव्हाण, नेचर वॉक ट्रस्टचे अनुज खरे आदी उपस्थित होते.
विजय बेदी यांनी अनेक वर्षे खर्ची करून बेडकावर ५४ मिनिटांचा माहितीपट तयार केला. त्यामध्ये त्यांनी बेडकाचा संपूर्ण जीवनप्रवास उलगडला आहे. बेडकाचा जन्म कसा होतो, त्यांचे पावसाशी असलेले नाते, बेडकांचे मिलन, बेडूक अंडी किती देतात, त्यांचे पुढे काय होते असा सर्व प्रवास या माहितीपटात अतिशय सुंदररित्या दाखविण्यात आला.
दक्षिण भारतात आणि ईशान्य भारतामध्ये मॉन्सून येण्यापूर्वी बेडकांचे लग्न लावले जाते. त्याला मंडूक परिणय म्हणतात. त्यांचे लग्न लावून पूजा करून पाण्यात सोडण्यात येते. त्यामुळे वरूणराजा प्रसन्न होऊन चांगला पाऊस पाडतो, अशी तेथील नागरिकांची श्रध्दा आहे. त्यासाठी दरवर्षी मे-जून महिन्यात बेडकांचे लग्न लावले जाते. उत्तर प्रदेशमध्ये बेडकाचे अतिशय सुंदर असे मंदिर देखील आहे. बेडकाची भव्यदिव्य अशी प्रतिकृती तयार केलेली आहे.
बेडकाचे लग्न का?
पाऊस येण्यापूर्वीची चाहूल बेडकांना सर्वात अगोदर होते. त्यांचे डराव डराव सुरू झाले की, जोरदार पाऊस येतो, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे देशात अनेक ठिकाणी बेडकांचे लग्न करण्यात येते. बेडकाचे लग्न झाले की, पाऊस येतो, म्हणून ही प्रथा सुरू झाली.
शेकडो अंडी का घालतात?
बेडूक मादी एका वेळी शेकडो-हजारो अंडी घालते. एका अंडी घातली की, पुन्हा त्यांना ती पाहत नाही, तिथून निघून जाते. या अंड्यांवर अनेक कीटक, जीव भक्ष्य बनवतात, पण त्यातील केवळ चार-पाच जगतात. कदाचित त्यासाठीच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अंडी घालत असाव्यात, असे तज्ज्ञांचे मत आहे.