आळंदी : संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर डोके ठेवून नतमस्तक होऊन दर्शन घेण्याची भाविक आतुरतेने वाट पाहत होते. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून बंद असलेले माउलींच्या समाधीचे स्पर्श दर्शन येत्या २ एप्रिल अर्थातच चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्यापासून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे समस्त वारकरी तसेच आळंदीकरांकडून स्वागत करण्यात येत आहे.
राज्यात मागील दोन वर्षांपासून कोरोना संसर्गजन्य रोगाचे सावट पसरले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद केली होती. दरम्यान अलीकडच्या काही महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने पुन्हा एकदा मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली. माउलींच्या मंदिरात भाविकांना मंदिर प्रवेशावेळी एकमेकांमध्ये सोशल डिस्टन्स पाळणे, तोंडावर मास्क वापरणे, वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणे अशा नियमावली बंधनकारक करून मुख दर्शन दिले जात होते. मात्र भाविकांना माउलींच्या समाधीवर डोके ठेवून दर्शन घेण्याची आस लागून होती.
यासंदर्भात देवस्थानने विशेष बैठक आयोजित करून सर्व गोष्टींचा आढावा घेतला. या बैठकीमध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर सकाळी ६ वाजल्यापासून समाधी स्पर्श दर्शन सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे भाविकांना थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन माउलींच्या संजीवन समाधीचे स्पर्श दर्शन घेता येणार आहे. कोरोनामुळे सन २०२० पासून माउलींचे समाधी स्पर्श दर्शन बंद होते. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून मुखदर्शन सुरू करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर समाधी स्पर्श दर्शन सुरू करावे अशी मागणी वारकरी संप्रदाय तसेच राजकीय मंडळींनी मंदिर देवस्थानकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.
गुढीपाडव्यापासून भाविकांना थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन माउलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेता येणार आहे. मात्र यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. वृद्ध, आजारी व्यक्ती, गर्भवती माता आणि लहान बालकांनी संस्थानतर्फे सुरू असलेल्या ऑनलाइनद्वारे दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी केले आहे.
गुढीपाडवा दिनी मंदिरातील कार्यक्रम
पहाटे ३.३० वाजता घंटानाद, काकडा आरती
पहाटे ५.३० पवमानपूजा, दुधारती, गुढीपूजा
पहाटे ५.३० ते दुपारी १२.०० भाविकांना ‘श्रीं’चे स्पर्श दर्शन
पहाटे ५.३० ते सकाळी १०.०० ‘श्रीं’च्या चलपादुकांवर अभिषेक / महापूजा
सकाळी ६ ते ७ पंचांग पूजन
सकाळी ७ ते सकाळी ८ प्रवचन
दुपारी १२ ते १२.३० ‘श्रीं’ना महानैवेद्य
दुपारी १२.३० ते दुपारी २ भाविकांना ‘श्रीं’चे स्पर्श दर्शन
दुपारी २ ते सायं. ६ ‘श्रीं’ना चंदन उटीद्वारे श्री गणेश अवतार, यावेळी भाविकांना संजीवन समाधीचे दर्शन बंद राहील.
दुपारी २ ते सायं. ६ भाविकांना ‘श्रीं’च्या चलपादुकांचे दर्शन कारंजा मंडप
दुपारी ४ ते सायं. ६ वीणामंडपात कीर्तन - वै. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था
सायं. ६. ०० ते रात्री ८.०० भाविकांना ‘श्रीं’च्या गणेश अवताराचे मुखदर्शन
रात्री ८ ते रात्री ८.३० ‘श्रीं’ची धुपारती
रात्री ८.३० ते रात्री ११.३० भाविकांना ‘श्रीं’च्या गणेश अवताराचे मुखदर्शन
रात्री ११.३० ते रात्री १२.०० ‘श्रीं’ची शेजआरती त्यानंतर मंदिर बंद