इंदापूर : वारंवार पुकारण्यात येणाऱ्या बंदमुळे होणारी गळचेपी व नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मारक ठरणाऱ्या अशा बंदच्या वेळी दुकाने, व्यवसाय बंद ठेवायचा नाही, असा निर्णय इंदापूर शहर व्यापारी संघाने सर्वानुमते घेतला आहे.
बंदचे इशारे व व्यापाऱ्यांनी घेतलेला निर्णय याच्या पार्श्वभूमीवर दुकाने, व्यवसाय याचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेऊन योग्य ती कार्यवाही व्हावी. निर्भयपणाने आमचे व्यापार उदीम चालू राहतील, यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती इंदापूर शहर व्यापारी संघाने निवेदनाद्वारे तहसीलदार व पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.
कोणती ही घटना घडल्यास वेगवेगळे पक्ष किंवा संघटना निषेध म्हणून शहर बंदचे आवाहन करतात. शहरातील सर्व व्यापारीवर्ग, छोटे व्यापारी, लघु उद्योग, फेरीवाले, पथारी व पदपथावरील छोटे व्यावसायिक यांना बंदमध्ये सहभागी व्हावे लागते. असे बंद वारंवार झाल्यामुळे व्यापाऱ्यांचे, लघु, मध्यम व्यवसाय असणाऱ्यांचे, दुकानात असणाऱ्या कामगार, मोलमजुरी करणारे बांधव यांचे अतोनात नुकसान होत आहे, असे संघाने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मागील काही वर्षात कोरोना काळ व मागील दसरा, दिवाळी आदी सण-वारांच्या दिवशीही अशा प्रकारचे बंद ठेवण्यात आले. ही बाब प्रशासनास संघाने वेळोवेळी निदर्शनास आणून दिली आहे. निवेदनेही दिलेली आहेत. तथापि यासंदर्भात प्रशासन, सामाजिक संघटना, सर्वच पक्ष यांनी त्याची दखल घेतलेली नाही. येथून पुढे व्यवसाय, उद्योगांना मारक ठरणाऱ्या अशा बंदच्या काळात दुकाने, व्यवसाय बंद ठेवायचे नाहीत, असा निर्णय इंदापूर शहर व्यापारी संघाच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे. याचा गांभीयनि विचार करून दुकाने, व्यवसायाचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेऊन योग्य ती कार्यवाही व्हावी व निर्भयपणाने आमचे व्यापारउदीम चालू राहणेस सहकार्य करावे, अशी अपेक्षा निवेदनात शेवटी करण्यात आली आहे.