Anna Bansode: अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे हे विधानसभेचे उपाध्यक्ष बनले आहेत. या पदासाठी एकच अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यामुळे अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड झाली असून, याची अधिकृत घोषणा विधानसभा अध्यक्षांकडून २६ मार्च रोजी केली जाणार आहे. तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर अण्णा बनसोडेंचं मंत्रिपदाची अपेक्षा होती. पण, त्यांना डावलण्यात आलं. त्यामुळे बनसोडे नाराज झाले होते. आता अजित पवारांकडून मंत्रिपदाचा दर्जा असलेलं पद देऊन ती नाराजी दूर केल्याचे बोलले जात आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पिंपरी चिंचवड या राखीव असलेल्या मतदारसंघाचे अण्णा बनसोडे हे आमदार आहेत. २०१४ मध्ये झालेला पराभव वगळता ते तीन वेळा निवडून आले आहेत. २०२४ मध्ये महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर अण्णा बनसोडे यांना मंत्रिपदासाठी इच्छुक होते. पण, त्यांना संधी मिळाली नाही, त्यामुळे नाराज झाले होते. आता विधानसभा उपाध्यक्षपदासाठी दोन-तीन नावे स्पर्धेत होती. अखेर अण्णा बनसोडे हे उपाध्यक्ष बनले आहेत.
हेही वाचा >> रणजीत शिंदेंना मोठा दिलासा; दूध संघाची चौकशीच प्रशासनाने केली रद्द
कोण आहेत अण्णा बनसोडे?
अण्णा बनसोडे यांचा राजकीय प्रवास महापालिकेच्या निवडणुकीपासून सुरू झाला. राजकारणात येण्यापूर्वी ते पान टपरी चालवायचे. हा व्यवसाय करत असताना ते राजकारणात सक्रीय झाले आणि १९९७ मध्ये त्यांनी पहिल्यांदा महापालिकेची निवडणूक लढवली आणि नगरसेवक बनले. २००२ मध्ये पुन्हा ते नगरसेवक बनले. याच काळात त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले.
याच काळात ते अजित पवारांच्या संपर्कात आले आणि आता ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. ज्या ठिकाणी त्यांची पूर्वी पान टपरी होती, त्याच जागेवर आता त्यांचं जनसंपर्क कार्यालय आहे. २००९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकले. मात्र, २०१४ मध्ये त्यांचा पराभव झाला.
राष्ट्रवादीने नाकारली होती उमेदवारी, पण...
२०१९ मध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी देण्यास नकार दिला होता. पण, त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून एबी फॉर्म दिला गेला आणि ते विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अण्णा बनसोडे अजित पवारांसोबत गेले. २०२४ मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले.