कल्याणीनगर प्रकरणावरून गरीब आणि श्रीमंतांना वेगळे कायदे असल्याचे स्पष्ट दिसतंय - नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 01:49 PM2024-05-24T13:49:49+5:302024-05-24T13:50:12+5:30
पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने हाताळले नसल्याने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, तसेच दोषींना कठोर शिक्षा व्हावी
पुणे : ‘कल्याणी नगर घटनेतील आरोपीला अवघ्या १५ तासांत जामीन मिळतो, हे अत्यंत गंभीर आहे. यातून गरीब आणि श्रीमंतांना वेगळे कायदे असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हे अत्यंत आक्षेपार्ह आणि सामान्यांना न्याय नाकारणारे आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने हाताळले नसल्याने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, तसेच दोषींना कठोर शिक्षा व्हावी,’ अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसे पत्रही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
पटोले म्हणाले की, कल्याणी नगर येथील घटना अत्यंत गंभीर आहे. तरीही पाेलिसांनी कार चालकाची वैद्यकीय तपासणी केली नाही. दोघांचा मृत्यू झाल्यानंतरही किरकोळ कलमे लावून त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर केले आणि त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव होता का, ज्यामुळे आरोपी मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. अपघातानंतर सत्ताधारी पक्षाचा एक आमदार पोलिस ठाण्यामध्ये होता. त्या आमदाराची या प्रकरणात नेमकी भूमिका काय? कारचालक मुलाच्या वडिलांचे कुख्यात माफियाशी संबंध असल्याचेही समजते. याबाबत काय ते स्पष्ट करावे.
एवढी तत्परता का दाखवतात गृहमंत्री?
ज्या बेकायदेशीर घटनांमध्ये भाजपचा काही संबंध असतो वा इतर संबंध असतात त्या ठिकाणीच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने जातात. एरवी ते कोणतेच प्रकरण गांभीर्याने घेत नाहीत. मग याच प्रकरणात एवढी तत्परता का? या प्रकरणात पुण्याचे पालकमंत्री मात्र कुठेच दिसत नाहीत, हेही आश्चर्याचे आहे, असेही प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.