पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपने मोठा भ्रष्टाचार केला. स्थायी समितीच्या अध्यक्षावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला. त्याला पैसे खाताना पकडले. जेल झाली. राष्ट्रीय पातळीपासून गावपातळीवरील भाजपचे नेते भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, भाजप देश बरबाद करायाला निघाला आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वाल्हेकरवाडी येथे केली.
वाल्हेकरवाडीतील मेळाव्यात पटोले म्हणाले, ‘‘राज्यपाल, भाजपचे मंत्री यांच्याकडून सातत्याने महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान, राज्याची बदनामी केली जात आहे. थोर पुरुषांचा अपमान करणे हे भाजपचे धोरण आहे. महाराष्ट्राची बदनामी करण्याचे पाप भाजपने केले. महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे. देशाची सार्वजनिक संपत्ती विकून देश चालविला जात आहे. कृत्रिम महागाई निर्माण केली आहे. तरुणांना बेरोजगारीच्या खाईत लोटले आहे. शेतकरी, छोटे व्यापारी यांना बरबाद करत आहेत.
महाविकास आघाडी सरकार बेईमानी, खोके, धोक्याने पाडले
पटोले म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी सक्षमपणे महाराष्ट्राला पुढे नेत होते. परंतु, विश्वासघात करुन खोक्यांच्या जोरावर आणि दिल्लीत असलेल्या महाशक्तीच्या भरवशावर सरकार पाडले. महाशक्तीला जनशक्ती दाखविण्याची संधी आली आहे. आघाडी सरकार बेईमानी, खोके, धोक्याने पाडले. त्यांना पोटनिवडणुकीत त्यांची जागा दाखवावी.’’