पुणे : महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, त्या सरकारात पुणे जिल्ह्याला चांगला मान होता, मग आता नव्या शिंदेशाहीत पुणे जिल्ह्याचे ते वैभव कायम राहणार का असा प्रश्न जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. त्यातच शिवसेनेच्या बंडखोरांमध्ये पुण्यातून कोणीच नसल्याने सर्व जबाबदारी भारतीय जनता पार्टीवर असून त्यांच्याकडून पुणे जिल्ह्याला काय मिळेल याची उत्सुकता आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, भोसरीचे आमदार महेश लांडगे या तिघांची नावे सध्या चर्चेत आहेत. तरीही भाजपाच्या धक्कातंत्रांला अनुसरून आणखी काही नावे अचानक पुढे येण्याची शक्यता आहे. त्यात कॅन्टोन्मेट विधानसभेचे आमदार सुनिल कांबळे, दौंडचे आमदार राहूल कूल, शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची नावे अचानक पुढे येऊ शकतात. पुणे शहर व जिल्ह्यानेही भाजपाला आतापर्यंत विधानसभेला बराच मोठा हात दिला आहे. पुणे शहरात तर सन २०१४ ते १९ या पंचवार्षिकमध्ये ८ ही जागा भाजपाच्या ताब्यात होत्या. त्यामुळेच नव्या मंत्रीमंडळात पुणे जिल्ह्याला चांगली संधी मिळेल अशी भाजपाच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मुळचे कोल्हापूरचे असले तरी निवडून मात्र पुण्यातील कोथरूडमधून आले आहेत. युती सरकारमध्ये ते विधानपरिषदेचे आमदार होते. ते मंत्री होतेच, कोल्हापूरचे पालकमंत्रीही होते व पुण्याचे गिरीश बापट खासदार झाल्यावर पुण्याचेही पालकमंत्रीपद त्यांच्याकडेच आले. देवेंद्र फडणवीस यांच्या खालोखाल त्यांना पक्षात मान आहे. त्यामुळेच या सरकारात उपमुख्यमंत्री ठेवले गेले तर ते त्यांच्याकडेच दिले जाण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे. तसे झाले तर पुण्याचा मान नव्या सरकारमध्येही कायम राहील, फक्त अजित पवार यांच्याऐवजी चंद्रकांत पाटील यांचे नाव असेल.
मात्र त्यामुळेच पुण्यात अन्य मंत्रीपदे दिली जातील का, ती कोणती असतील असा प्रश्न आहे. भाजपाच्या ६ आमदारांमध्ये माधूरी मिसाळ ज्येष्ठ आहेत. यावेळीच त्यांना संधी होती, तसा दावाही त्यांनी केला होता, मात्र सरकारचे आले नाही. आता अडीच वर्षांनी पुन्हा संधी आल्याने ते पुन्हा दावा करतील असे दिसते आहे. पुण्यातून आतापर्यंत एकही महिला मंत्री झालेली नाही. ती संधी साधायचे पक्षाने ठरवल्यास मिसाळ यांचे नाव अग्रभागी असेल असे सांगितले जात आहे. मंत्रीपदासाठी पिंपरी-चिंचवडचाही विचार भाजपाकडून होऊ शकतो. तिथे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे नाव घेतले जात आहे.