पुणे : पाणीपट्टीमध्ये केलेल्या १२ टक्के वाढीच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने सोमवारी सकाळी खडकमाळ आळी परिसरातून टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयापर्यंत महिलांचा मोर्चा काढण्यात आला. शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आता असे मोर्चे काढण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश चिटणीस, नगरसेवक संजय बालगुडे यांनी दिली.चोवीस तास पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली प्रशासनाने पाणीपट्टीत १२ टक्के वाढ केली आहे. पुढील ५ वर्षे दर वर्षी ५ टक्के प्रमाणे ही वाढ होत राहणार आहे. बालगुडे यांनी सांगितले, की महिलांमध्ये या वाढीचा फार मोठा रोष आहे. चोवीस तास पाणी देऊच नका, रोज फक्त दोन तास पाणी द्या, मात्र ते पुरेशा प्रेशरने द्या, अशी महिलांची मागणी आहे. पुण्याच्या पूर्व भागात पाणीपुरवठ्याचा त्रास होत असून, त्यामुळेच महिलांनी उस्फूर्तपणे सोमवारचा मोर्चा काढला, असे बालगुडे म्हणाले.खडकमाळ परिसरातील सुमारे २०० महिला सकाळपासूनच जमा झाल्या होत्या. पाणीपट्टी वाढीच्या निषेधाच्या घोषणा देत, प्रशासनाचा निषेध करणाऱ्या घोषणा लिहिलेले फलक हातात घेऊन अनेक महिला मोर्चात सहभागी झाल्या. वासंती चव्हाण, मनीषा नलगे, दीपाली कोळेकर, साधना कुदळे, राजश्री जगताप आदी महिलांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. खडकमाळ आळीतून प्रमुख रस्त्याने जात मोर्चा टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात नेण्यात आला. तिथे उपायुक्त रवी पवार यांना महिलांनी निवेदन दिले. पवार यांनी महिलांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन त्यांना दिले.बालगुडे म्हणाले, की या अन्याय पाणीपट्टी वाढीविरोधात सर्वच पुणेकरांच्या भावना तीव्र आहेत. आधीच पाणीटंचाईचा सामना करताना पुणेकर त्रस्त झाले आहेत. एक दिवसाआड पाणी येत असले, तरी ते पुरेशा दाबाने देण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.
पाणीपट्टी वाढीविरोधात मोर्चा
By admin | Published: April 19, 2016 1:24 AM