पुणे : शहरातील प्रत्येक बसथांब्यांसमोर ‘बस बे’ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. या ‘बस बे’ इतर खासगी वाहने थांबविल्यास त्यांच्यावर वाहतुक पोलिसांमार्फत कारवाई केली जाणार असल्याची माहिती पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) तील अधिकाऱ्यांनी दिली. शहरात तीन हजारांहून अधिक बसथांबे आहेत. बसचालकांनी या बसथांब्यासमोर बस थांबवून प्रवाशांना घेणे अपेक्षित आहे. मात्र, अनेकवेळा चालकांकडून थांब्यापासून काही अंतरावर बस थांबविली जाते. काहीवेळी बसथांब्यासमोर किंवा त्यालगत अन्य खासगी वाहने उभी असतात. त्यामुळे बसचालकांना थांब्यासमोर बस उभी करणे शक्य होत नाही. परिणामी प्रवाशांना धावपळ करत बस पकडावी लागते. यावर तोडगा काढण्यासाठी पीएमपी व महापालिकेकडून विविध बसथांब्यासमोर रंगाचे पट्टे मारून बस बे तयार केले जातात. मागील काही वर्षांत अनेक काही थांब्यावर असे बस बे करण्यातही आले होते. मात्र, कालांतराने ते पुसट झाल्यानंतर त्याकडे पुन्हा दुर्लक्ष झाले. त्यातही काही ठराविक मार्गांवरच हे बस बे होते. आता जवळपास तीन हजार बसथांब्यांसमोर बस बे तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे समजते. त्याची सुरूवातही करण्यात आल्याची माहिती पीएमपीतील अधिकाऱ्यांनी दिली. हे बस बे दीर्घकाळ टिकतील यादृष्टीने त्याची आखणी केली जाणार आहे. सर्व बस यामध्येच उभ्या राहतील याबाबत दक्षता घेतली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनाही रस्त्याचे मधे जाऊन बस पकडण्याची जोखीम पत्करावी लागणार नाही. पिवळ्या रंगाचे पट्टे मारून तयार करण्यात आलेल्या बस बेमध्ये अन्य खासगी वाहनांना थांबता येणार नाही. अशी वाहने थांबल्याचे आढळून आल्यास वाहतुक पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत पोलिसांशीही चर्चा झाल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रत्येक बसस्थानकासमोर ‘बस बे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 8:18 PM
काहीवेळी बसथांब्यासमोर किंवा त्यालगत अन्य खासगी वाहने उभी असतात. त्यामुळे बसचालकांना थांब्यासमोर बस उभी करणे शक्य होत नाही.
ठळक मुद्देजवळपास तीन हजार बसथांब्यांसमोर बस बे तयार करण्याचे उद्दिष्ट