पुणे : जिल्ह्यात होऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सावध पवित्रा घेत जुन्नर व पुरंदर तालुक्यातील नीरा बाजार समितीसाठी काँग्रेसशी पुन्हा हातमिळवणी केली आहे. मात्र, भोरमध्ये काँग्रेसच शत्रू नं १, अशी भूमिका घेत येथे शिवसेनेशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत.जिल्ह्यात जुन्नर, आंबेगाव, खेड, नीरा व भोर या पाच कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका होत आहेत. यासाठी सध्या जिल्ह्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. गेल्या विधानसभा व लोकसभेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणुका लढल्या. त्यानंतरही दूध संघ व ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. मात्र, आता होऊ घातलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व दिलीप वळसे-पाटील यांनी समविचारी पक्षांशी ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे, तेथे एकत्र येऊन निवडणुका लढविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार जुन्नर व पुरंदरमध्ये त्यांनी आघाडी केली आहे. मात्र, आंबेगावमध्ये आमची एकहाती सत्ता येणार असल्याने तेथे मात्र ते स्वतंत्र लढत आहेत. जुन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बेनके व काळे असे दोन गट पडले होते. यातील काळे गटाने शिवसेनेशी हातमिळवणी केली होती. मात्र, येथील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी अजित पवार यांनी मुंबईत बैैठक घेऊन या दोन्ही गटांत दिलजमाई केली. समविचारी पक्षाला बरोबर घेऊन ही निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. जुन्नरमध्ये राष्ट्रवादीतील खरोखरच मनोमिलन झाले का, याबाबत शंका उपस्थित होत आहे. शिवसेना शेतकरी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून ही निवडणूक लढवीत आहे. या पॅनलला राष्ट्रवादी व काँग्रेसमधील एका गटाचा आतून पाठिंबा असल्याची चर्चा सुरू आहे.
जुन्नर, पुरंदरमध्ये आघाडी
By admin | Published: September 01, 2015 3:57 AM