या मालिकेतला शेवटचा ब्रिस्बेन सामना म्हणजे भारताच्या जिगरबाज लढ्याचा परमोच्च बिंदू ठरला. भारताच्या विजयाने ऑस्ट्रेलियाचे पुरते गर्वहरण केले. खेळात एकाची हार, एकाची जीत हे तर गृहीतच असते. पण हा जय-पराजय होतो कसा यावर त्या संघाची लायकी ठरते. यजमान ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेनचा गड ३२ वर्षांत पहिल्यांदाच उद्ध्वस्त झाला. भारताने ज्या जिद्दीने, सफाईने तो केला त्यावर ऑस्ट्रेलियन क्रिकेटरसिकांना विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. त्यांच्या लेखी भारताची ‘बी टीम’ खेळत होती आणि ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या तुलनेत सर्वार्थाने तगडा होता. कमिन्स, हेझलवूड, स्टार्क आणि लायन या चौघांच्या एकत्रित कसोटी बळींची संख्याच एक हजारच्या पुढे आहे. भारताच्या वॉशिंग्टन सुंदर, सिराज, नटराजन, सैनी, ठाकूर या तोफखान्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले पदार्पणच मुळी या मालिकेतले. विराट कोहली, आर. आश्विन, जडेजा, बुमराह, शमी, लोकेश राहुल हे सहा सर्वोत्तम खेळाडू संघाबाहेर गेलेले. चेतेश्वर पुजाराचा अपवाद वगळता अजिंक्यने अनअनुभवी खेळांडूंसह खिंड लढवली. पण हा नवा, तरुण भारत जिद्दीत कुठेही कमी पडला नाही. ‘आयपीएल’ला कोणी कितीही नावे ठेवो, पण याच ‘आयपीएल’ने गावखेड्यातून येणाऱ्या भारतीय खेळाडूंना जगातल्या कोणत्याही संघापुढे छाती काढून उभे ठाकण्याचा आत्मविश्वास दिला. यात उन्मत्तपणा नाही तर ‘विजय कधीच दूर नसतो, शेवटचा चेंडू पडेपर्यंत पराभव मानायचा नाही,’ ही जिद्द ‘आयपीएल’ने निर्माण केली. भारताची ‘बेंच स्ट्रेन्थ’ किती मजबूत आहे हे ऑस्ट्रेलियातल्या दमदार विजयाने सिद्ध केले. शुभमन गिल, ऋषभ पंत, हनुमा विहारी, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, सैनी हे खेळाडू ‘अंडर नाईंटीन’मधून आले. वॉशिंग्टन सुंदर, नटराजन हे तर चक्क ‘नेट बॉलर’. पण या सर्वांमधली चुणूक ओळखणाऱ्या राहुल द्रविडचे कौतुक करावे लागेल. भारतीय क्रिकेटची नवी पिढी त्याच्या अनुभवी नजरेतून घडत आहे. लढाऊ बाणा निर्माण करणाऱ्या कोच रवी शास्त्रीचे योगदान नाकारता येणार नाही. ब्रिस्बेनच्या विजयाने निवड समितीपुढे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. जगातले सर्वात श्रीमंत मंडळ असल्याने ‘आयसीसी’त भारताची दादागिरी चालतेच तशी ती मैदानातही चालवू द्यायची तर कसोटी संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेच्या धीरोदात्त हाती सोपवण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागेल. ‘वन डे’च्या नेतृत्वासाठी रोहित आणि टी-ट्वेन्टीच्या नेतृत्वासाठी राहुल या पर्यायांचा विचार करावा लागेल. सचिन तेंडुलकरने कर्णधारपदाचा मोह टाळला आणि त्याची कारकीर्द आणखी बहरली. विराट कोहलीनेही सचिनच्या पावलावर पाऊल टाकत कर्णधारपदाचा त्याग केला तर ते त्याच्या आणि संघाच्या हिताचे ठरेल. क्रिकेटमधली ‘सुपरपॉवर’ होण्याच्या मार्गावर असल्याची जाणीव करून देणारा ब्रिस्बेनचा विजय भारतीयांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील.
अग्रलेख - १९ जानेवारी २०२०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:11 AM