पिंपरी : महापालिका निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होईल, हे लक्षात घेऊन इच्छुकांनी मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे. कोणाचा वाढदिवस असो की एखादा सण, उत्सव असो, कशाचेही औचित्य साधून इच्छुक उमदेवार मतदारांच्या संपर्कात राहत आहेत. एकीकडे पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी भाऊ, अण्णा, तात्या अशा स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत फिल्डिंग लावली आहे, तर दुसरीकडे मतदारांच्या भेटी घेण्यावर भर दिला आहे. त्यामुळे इच्छुकांची धावपळ उडाली आहे. फेबु्रवारी २०१६मध्ये महापालिकेची निवडणूक होत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होऊ शकते. त्यानंतर खर्च केल्यास निवडणूक विभागाला खर्चाचा हिशोब द्यावा लागेल. एक तर निवडणुकीसाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा घालण्यात आली आहे. निवडणूक विभागाने निश्चित केलल्या मर्यादेतच निवडणूक खर्च करायचा आहे. एक महिन्यापूर्वी केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय लागू केला. सध्या एटीएम केंद्र बंद आहेत. बँकेतून रक्कम काढण्यास मर्यादा आल्या आहेत. अशा परिस्थितीत मोठे कार्यक्रम घेण्यास इच्छुकांना अडचणी येत आहेत. आचारसंहितेनंतर खर्चावर मर्यादा येणार आहेत. परंतु, अगोदरपासूनच नोटाबंदीमुळे अडचणी येऊ लागल्याने इच्छुकांची तारांबळ उडू लागली आहे. नोटाबंदीनंतर बँकेतून रक्कम काढण्यासाठी मर्यादा आलेली परिस्थिती अशीच राहिली, तर ऐन निवडणुकीत आणखी अडचणी येणार, हे लक्षात घेऊन पर्यायी व्यवस्थेचे नियोजन आतापासूनच सुरू आहे. इच्छुकांनी उधारीवर काही कामे करून घेण्याचा पर्याय निवडला आहे. कार्यकर्त्यांकरिता हॉटेलचे बुकिंग केले जात आहेत. (प्रतिनिधी)निवडणुकीपूर्वीच दमछाक गतनिवडणुकीत झोपडपट्ट्यांमध्ये काहींनी अक्षरश: नागरिकांना महिना, दोन महिन्यांचा किराणा भरून दिला होता. या वेळी तशाच पद्धतीने काही करता येईल का, याचीही चाचपणी होत आहे. गत निवडणुकीपेक्षाही निवडणूक उमेदवारांना सर्वच बाबतीत कठीण जाणार आहे. फेर प्रभागरचनेनुसार सुमारे ५० हजार मतदार संख्येचा प्रभाग आहे. त्यामुळे इच्छुकांची निवडणुकीपूर्वीच दमछाक होत आहे.
नेत्यांकडे मोर्चेबांधणी; इच्छुकांची धावपळ
By admin | Published: December 25, 2016 4:46 AM