युगंधर ताजणे
पुणे ः पुणे तिथे काय उणे याचा प्रत्यय अनेकदा वेगवेगळ्या प्रसंगावरुन येत असतो. त-हेवाईक वागणे, बोलणे आणि कृती यामुळे जगाच्या पाठीवर आपली विशेष छाप उमटविलेले पुणेकर कायमच चर्चेत राहतात. जगावेगळी आवड आणि निवड याचा प्रभाव इतरांवर टाकण्यास काहींना नेहमीच आवडते. पुण्यात राहणा-या राधिका दाते - वाईकर त्यापैकी एक त्यांनी तब्बल 13 वर्षांपूर्वी चंद्रावर एक एकर जागा खरेदी केली. त्यासाठी एका संस्थेकडे पैसे देखील भरले. मात्र प्रत्यक्षात आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या खुप उशिरा लक्षात आले. पंजाब येथील एका व्यक्तीने लुनार फेडरेशनच्या माध्यमातून चंद्रावर जागा खरेदी केल्याची बातमी राधिका यांनी एका न्युज वाहिनीवर पाहिली. त्यावेळी त्या बातमीनंतर ’’आपल्याला चंद्रावर जागा खरेदी करायची असल्यास थेट आमच्याशी संपर्क साधा.’’ अशा स्वरुपाची जाहिरात करण्यात आली होती. हे वाचुन राधिका यांनी संबंधित संस्थेशी संपर्क साधला. आणि 6 नोव्हेंबर 2005 मध्ये त्यांनी चंद्रावर जागा 50 हजार रुपयांना खरेदी केली.एक एकर जागा खरेदी केल्याचे त्यांना सांगण्यात आले. याविषयी अधिक माहिती देताना राधिका म्हणाल्या, माझे त्यावेळी नुकतेच लग्न झाले होते. आणि भविष्यातील काही संकल्पाचा विचार करीत तसेच मुलांच्या शिक्षणासाठी काही पैसे साठवले होते. मात्र त्या दरम्यान टीव्हीवर पाहिलेल्या जाहिरातीने माझे लक्ष वेधुन घेतले. त्यानुसार कंपनीच्या वेबसाईटवर संपर्क साधला. मात्र त्याकाळी आजच्या इतकी इंटरनेट सुविधा प्रगत आणि सक्षम नव्हती. त्यासंबंधी कुठलेही काम करायचे झाल्यास सायबर कॅफेत जावे लागायचे. त्यामुळे सुरुवातीला जागा खरेदी दरम्यान, पैसे भरताना आम्हाला लुणार फेडरेशनच्या माध्यमातून चंद्रावर जागा खरेदी झाल्यानंतर तिथे एक कॉलनी उभारायचा मानस असल्याचे सांगण्यात आले. वास्तविक आपली फसवणूक होत आहे हे आमच्या गावीही नव्हते. इतकेच नव्हे तर चंद्रावर पाण्याचा मुबलक साठा असून तिथे मानवी वस्तीस पोषक असे वातावरण असल्याचे त्यांनी सांगताच अगदी कमी वेळात पैसे भरले. त्यानंतर 9 वेगवेगळी कागदपत्रे प्राप्त झाली. यात मालकीपत्र, मिनरल राईट सर्टिफिकेट, लुणारची नियमावली, बिल आणि अधिकार, लुणारचा नकाशा आणि सर्व लुणारच्या जागेचे वर्णन त्यात करण्यात आले होते.
अशाप्रकारे झालेल्या फसवणूकीविषयी नेमकी कुणाकडे तक्रार करायची हा प्रश्न आहे. आता माझा मुलगा कनिष्ठ महाविद्यालयात दुस-या वर्षात शिकत आहे. त्याला भविष्यात मेडिकलकरिता प्रवेश घेण्याची इच्छा असून त्याकरिता पैशांची गरज आहे. माझ्याकडे चंद्रावर जागा घेऊन त्या जागेची मालकी मिळाल्यासंबंधीची कागदपत्रे आहेत. मात्र त्याचा काही उपयोग होणार आहे की नाही याबद्द्ल शंका आहे.
पोलीसांना सांगितल्यानंतर त्यांनी हे प्रकरण खुप जुने असल्याचे सांगत त्यासंबंधी नेमका कुठला कायदा त्याजागी लागु होतो याबाबत साशंकता आहे. गेल्या सहा महिन्यापासून मला पैसे मिळावेत यासाठी अर्ज करीत आहे. मात्र नमूद केलेल्या क्रमांकावरुन त्याला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही.