बारामती : कोरोनामुळे आणीबाणीच्या परिस्थितीचा फायदा उचलत व्यापारीवर्गाने कवडीमोल किमतीत शेतमाल खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. बाजार समित्या बंद असल्याने तयार झालेला शेतमाल मिळेल त्या किमतीत विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ओल्या दुष्काळानंतर आलेल्या या मोठ्या संकटामुळे त्यांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडून गेले आहे. तर व्यापारी व दलाल वर्ग यापरिस्थितीत प्रचंड नफेखोरी करत असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेतकरी संघटनांच्या माध्यमातून केली जात आहे. कोरोना साथीच्या पार्शवभूमीवर केंद्र सरकारने 22 मार्चपासून 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. याचा परिणाम शेतमालावर देखील मोठ्या प्रमाणात झाला आहे. शेतमाल वाहतुकीची परवानगी जरी देण्यात आली असली तरी आठवडे बाजार, विविध कृषि उत्पन्न बाजार समिती बंद असल्याने लिलाव बंद आहेत. त्यामुळे मोठया प्रमाणातील शेतमाल विक्रीचे संकट शेतकऱ्यांसमोर आहे. नेमक्या याच संकटाचा फायदा उठवत व्यापारी वर्ग साखळी करून शेतमालाचे दर पाडू लागला आहे. केळी, द्राक्ष, तसेच काहीप्रमाणात डाळिंबाचे पीक शेतात काढणीला आले आहे. वाढत्या उष्णतेमुळे 'सनबर्निंग' चा धोका वाढतो. या फळबागा परिस्थिती निवळेपर्यंत शेतकरी ठेवू शकत नाही. मागील 20 दिवसांपूर्वी 8 ते 10 रुपये किलो असणारा केळीचा दर अवघ्या 4 रुपयांवर आला आहे. मात्र हीच केळी विक्रेते ग्राहकांना 60 ते 70 रुपये डझनने विकत असल्याचेही चित्र आहे. तर 90 ते 100 रुपये किलो असणारा निर्यातक्षम द्राक्षमाल 30 रुपये प्रतिकिलोने विकावा लागत आहे. अशीच परिस्थिती तरकारी पिकांची झाली असून मातीमोल किमतीत फळभाज्यांची विक्री शेतकऱ्यांना करावी लागत आहे. मात्र यामध्ये व्यापारी, दलाल, स्थानिक विक्रेत्याचे उखळ पांढरे होऊ लागले आहे.
.......................
नफेखोरी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : पांडुरंग रायते शासनाचे सर्व लक्ष सध्या साथरोग निवारणाकडे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी लूट व्यापारी वर्गाकडून सुरु आहे. या संकटाचा परिणाम शेती व्यवसायावर दीर्घकालीन स्वरूपात होणार आहे. नफेखोरी टाळण्यासाठी शेतमालाला जीवनावश्यक वस्तू कायद्यातून वगळले पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वत:च्या मालाची किंमत ठरवता येईल. सध्याच्या परिस्थितीत नफेखोरी करणाऱ्या व्यापारी व विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते यांनी केली.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांसोबत गुरुवार (दि. 2) व शुक्रवारी (दि.3) बैठकीसाठी बोलावले आहे. शनिवारपासून बाजार समितीत शेतमालाचे लिलाव सुरू करण्यासंदर्भात यावेळी चर्चा करणार आहोत. - अरविंद जगताप,सचिव कृषि उत्पन्न बाजार समिती, बारामती.