लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : प्रेमाचा करार... शब्द ऐकूनच धक्का बसला ना! प्रेमात कसला आलाय करार! पण तरुणाईही आता प्रॅक्टिकल बनलीय. कोणतीही भावनिक गुंतवणूक न ठेवता एकमेकांबरोबर काही क्षण एन्जॉय करायचे आणि लग्नाच्या कोणत्याही आणाभाका घ्यायच्या भानगडीत पडायचे नाही असे प्रेमाचे करारच तरुण-तरुणींमध्ये होऊ लागले आहेत, असे निरीक्षण समुपदेशकांनी नोंदविले आहे. तरुण फ्रस्टे्रशनमध्ये गेल्याच्या अनेक तक्रारी पालक मांडत आहेत, त्यासाठी समुपदेशकांची मदत घेतली जात आहे. ‘प्रेम’ ही एक सुंदर भावना आहे पण त्यातही तरुणाई आता प्रॅक्टिकल होत चालली आहे. प्रेम तर करायचं, पण कुठलीही भावनिक गुंतवणूक नको. मी तुझ्याबरोबर रिलेशनशिपमध्ये असताना दुसऱ्या मुलीलाही फिरवू शकतो, मला तीदेखील आवडू शकते, हे लक्षात ठेव, अशा गोष्टी सांगूनच प्रेमाचे मौखिक करार तरुणाईमध्ये होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तरुणीही यामध्ये मागे नाहीत, हे यातील विशेष! मात्र अशा करारांमधून तरुण-तरुणींमध्ये नैराश्याची भावना वाढत असल्याच्या केसेस समुपदेशकांकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे. विवाहित पुरुषांबरोबरही प्रेमाचे करार-काही तरुणी तर विवाहित पुरुषांबरोबर प्रेमाचे करार करीत असल्याचे निरीक्षण समुपदेशकांनी नोंदविले आहे. घरातून मुलींना जास्त पैसे दिले जात नसल्याने मौजमजा, दर्जात्मक जीवनशैली विकसित करण्यासाठी या मुली विवाहित पुरुषांबरोबर अफेअर करण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र दोघांमध्ये जर काही बिनसले तर मुली त्या पुरुषांविरुद्ध पोलिसांकडे तक्रारी करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत, असे समुपदेशकांकडून सांगण्यात आले.
प्रेमाच्या करारांमुळे तरुणाईत फ्रस्ट्रेशन
By admin | Published: June 28, 2017 4:08 AM