पुणे: महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईची जगभरात चर्चा केली जाते. राज्यात बऱ्याच गावांमध्ये कळसुबाईची आदराने पूजाही केली जाते. सर्वोच्च शिखराची महाराष्ट्रातील संस्कृती समजून घेण्यासाठी एफटीआयआयच्या युधाजीत बसू नावाच्या विद्यार्थ्याने माहितीपट तयार केला होता. त्याला जर्मनीतील आंतरराष्ट्रीय ऑनलाइन स्पर्धेत विशेष सन्मान मिळाला आहे. पुण्यातल्या एफटीआय मधल्या २०१७ बॅचच्या विद्यार्थ्याने केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होऊ लागले आहे.
बसू यांनी कळसुबाईचे दोन प्रकारचे माहितीपट तयार केले आहेत. पहिल्या प्रकारात फोटोंचा वापर केला असून त्यामध्ये कळसुबाईच्या जुन्या काळातील संस्कृतीचे दर्शन घडवले आहे. तर दुसऱ्या प्रकारात गाण्यांच्या स्वरूपात संवाद दाखवला आहे. त्यामध्ये भूतकाळ आणि वर्तमानातील घटनांचा उल्लेख केला आहे. असे बसू यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगा, कोकण, कळसुबाई सारखी शिखरे यांची वेगळीच संस्कृती आहे. नागरिक पूर्वीपासूनच शिखराची पूजा करणे, समुद्राला नारळ वाहने अशा नैसर्गिक साधनांना महत्व देत आले आहेत. अशाच प्रकारे कळसुबाई शिखराची गावागावात पूजा केली जाते. त्यावरूनच बसू यांनी प्रेरणा घेऊन कळसुबाई माहितीपट तयार केला.
ते म्हणाले, मी एकदा माझ्या मित्रासोबत महाराष्ट्रातील संस्कृती जाणून घेण्यासाठी सर्वत्र फिरत होतो. तेव्हा माझ्यासाठी सगळे नवीनच होते. परंतु प्रत्येक ठिकाणी मला वेगवेगळ्या गोष्ट दिसू लागल्या. गावातील जनजीवन, स्त्रियांची शिकवण, पारंपरिक गोष्टी यांचा अभ्यास करण्याची उत्सुकता निर्माण झाली.
असेच एकदा फिरत असताना गावातील एका व्यक्तीने कळसुबाई शिखरावर एक जण राहत असल्याची माहिती दिली. कळसुबाई हे उंच शिखर असून त्याचा इतिहास आणि संस्कृती जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल. असे त्याने सांगितले. त्यानुसार कळसुबाई शिखरावर माहितीपट तयार करण्याचे ठरवले.