पुणे : गोवा येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (इफ्फी) सरकारच्या विरोधात निदर्शने केल्याप्रकरणी अटक केलेल्या ‘एफटीआयआय’च्या दोन विद्यार्थ्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर, शनिवारी जामीन मंजूर करण्यात आला, तर प्रतिनिधी पास असूनही केवळ ‘एफटीआयआय’चा टी-शर्ट परिधान केल्यामुळे, आशुतोष या सिनेमेटॉग्राफीच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याला काहीवेळ ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले.‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यानी १३९ दिवस आंदोलन केल्यामुळे, सरकारविरुद्ध चांगलाच पंगा घेतला आहे. त्याचा बदला म्हणून सरकारने जाणीवपूर्वक ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांना इफ्फीपासून दूर ठेवण्यासाठी विद्यार्थी विभाग रद्द केला असल्याचे विद्यार्थ्याचे म्हणणे आहे. तरीही ‘एफटीआयआय’चे २० विद्यार्थी गोव्यात दाखल झाले असून, सरकारचा विविध मार्गाने निषेध व्यक्त करण्याचा त्यांनी जणू चंगच बांधला आहे. इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्याच्या समाप्तीच्या वेळेस बाल्कनीत बसून किस्ले आणि शुभम या ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांनी सरकारविरुद्ध निषेधाचे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली आणि जे व्हायचे तेच झाले. या दोन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये ‘एफआयआर’ दाखल करण्यात आली. स्टुड्ंट असोसिएशनने गोव्यामध्येच वकील मिळविला. शनिवारी न्यायालयात सुनावणी झाली आणि जामीन मंजूर झाला असल्याचे विद्यार्थी विकास अर्स आणि यशस्वी यांनी सांगितले.
‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांना जामीन मंजूर
By admin | Published: November 22, 2015 3:39 AM