पुणे: हातात काम नाही.. आता मुलाबाळांना आम्ही काय खायला-प्यायला घालणार....संस्थेत १५ ते २० वर्षे घाम गाळला... सेवा केली... त्याचे हेच फळ मिळायचे होते का? आज हातात दुसरी नोकरीदेखील नाही... घरभाडे... मुलांच्या शाळेचे शुल्क कसे भरणार..? अशी आर्त वेदना एफटीआयआयच्या कर्मचाऱ्यांच्या मुखातून सोमवारी बाहेर पडली. उद्यापासून (मंगळवार) आपण बेरोजगार होणार, या चिंतेने प्रत्येक कर्मचारी व्याकूळ झाला होता. आंदोलनाची झळ ही १५३ पैकी केवळ ८२ कर्मचाऱ्यांच्याच वाट्याला का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने एस. एम. खान यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या त्रिस्तरीय सदस्यांच्या अहवालानंतरच यावर निर्णय होणार असल्याचे प्रशासकांकडून सांगण्यात आल्यामुळे तूर्तास तरी कर्मचाऱ्यांचे भवितव्य हे ‘अधांतरी’च आहे. या आंदोलनामुळे संस्थेमधील सर्व कामकाज ठप्प झाले असून, येथील कर्मचाऱ्यांच्या हातात कोणतेच काम नाही, असा बागुलबुवा करीत संचालक प्रशांत पाठराबे यांनी दि. १ सप्टेंबरपासून लाईट, साऊंड विभागासह कार्पेंटर, पेंटर आदी तंत्रज्ञ कामगारांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची जाहीर घोषणा केली होती.त्यानुसार मंगळवारपासून ८२ कर्मचारी सक्तीच्या रजेवर जाणार आहेत. (प्रतिनिधी)
एफटीआयआयचे कर्मचारी सक्तीच्या रजेवर
By admin | Published: September 01, 2015 4:08 AM