लोणी काळभोर : पुणे जिल्हा अन्न व धान्य वितरण अधिकारी यांच्या पथकाने लोणी काळभोर येथे एचपीसीएल टर्मिनलची तपासणी केली. कंपनीच्या बाहेर सुरू असलेल्या इंधनाचा काळाबाजार करणाऱ्या इंधन माफियांचे मात्र त्यामुळे धाबे दणाणले आहेत. टर्मिनलमधील वजन मापे यांचा अहवाल अधिकाऱ्यांच्या वतीने पालकमंत्री गिरीश बापट यांना दोन दिवसांत सादर करण्यात येणार आहे. या प्रकारात सहभागी असलेल्या व अवैध प्रकारास मदत करणाऱ्यांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. अन्नधान्य वितरण अधिकारी नीलिमा धायगुडे, अन्न धान्य पुरवठा विभागाचे तहसीलदार प्रशांत पिसाळ, हवेलीचे तहसीलदार दशरथ काळे, तालुका पुरवठा अधिकारी तेजस्विनी पारखी, यांच्या पथकाने एचपीसीएल टर्मिनलची तपासणी केली. यामध्ये पेट्रोल, डिझेल व रॉकेल कशा पद्धतीने वाहनांमध्ये भरले जाते याची पाहणी केली. त्याचप्रमाणे पेट्रोल व डिझेलमध्ये दहा टक्के इथेनॉलचे प्रमाण असते का, याचीही चाचणी घेण्यात आली. कंपनीच्या नियमानुसार असलेली व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम व जीपीएस प्रणालीचीही तपासणी करण्यात आली, मात्र यामध्ये बहुतांश वाहनांमध्ये ही यंत्रणाच कार्यान्वित नसल्याचे दिसून आले. व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीमच्या आधारे कंपनीने अधोरेखित केलेल्या मार्गानुसारच इंधन वाहन वाहकाने नेणे क्रमप्राप्त असते. जर वाहनचालकाने ठरवून दिलेला मार्गक्रम चुकवला, तर त्याची तपशीलवार माहिती अपडेट्स होत असते. त्याचप्रमाणे जीपीएस सिस्टीमच्या आधारे संबंधित इंधन वाहन कमी, जास्त वेगाने मार्गक्रमण करत आहे किंवा एखाद्या ठिकाणी हे वाहन थांबल्यास त्याचे डिटेल्स या यंत्रप्रणाली अपडेट करत असतात. त्याचा दैनंदिन अहवाल कंपनीला कळविणे नियमानुसार आवश्यक असते. मात्र, एक एप्रिल ते चार एप्रिल दरम्यानचा अहवालच या तपासणी पथकाला आढळून आला नाही व शंभर टक्के वाहनचालक या नियमांचा भंग करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे इंधन वाहताना गैरप्रकार होत असल्याची दाट शक्यता अधोरेखित झाली आहे. काही वाहनचालकांनी अजूनही व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम व जीपीएस यंत्रप्रणाली वाहनांवर न बसविल्यामुळे इंधन भेसळीच्या रॅकेटला खतपाणी मिळत आहे.सुमारे आठ महिन्यांपूर्वीच लोणी काळभोर येथील कदमवाकवस्ती हद्दीतील टोलनाक्याशेजारी इंधन भेसळीचे मोठे रॅकेट या पथकाने पकडले होते. त्या वेळी पेट्रोल, डिझेल व रॉकेल यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचे आढळल्याने तीन इंधन ट्रॅकर सील करून पथकाने गुन्हाही दाखल केला. व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम व जीपीएस यंत्रप्रणाली यांचा शंभर टक्के दुरुपयोग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे भेसळीचे गैरप्रकार घडू शकतात. अनेक वाहनांनी ही यंत्रप्रणालीच न बसवल्यामुळे अशा वाहनांना कंपनीने इंधन वाहण्यासाठी परवानगी देऊ नये. संबंधित अहवाल पालकमंत्री यांच्याकडे दोन दिवसांत सादर करणार आहोत.- नीलिमा धायगुडे, अन्नधान्य वितरण अधिकारी
इंधन माफियांचे धाबे दणाणले
By admin | Published: April 10, 2016 4:09 AM