माळेगाव कारखाना प्रशासनाला निवेदन
मेखळी : ऊस वाहतूक दरवाढ मिळावी म्हणून वाहतूकदारांचे माळेगाव कारखाना प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मागील वर्षभरापासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असून, याचा फटका ऊस वाहतूक करणाऱ्यांना बसत आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव कारखाना क्षेत्रातील ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनमालकांनी ऊस वाहतूक दरवाढ मिळावी म्हणून मागण्यांचे निवेदन मंगळवार (दि.२२ जून) रोजी माळेगाव कारखान्याचे चेअरमन व संबंधित अधिकारी यांना देण्यात आले.
सन २०२०-२१ सालच्या गाळप हंगामापासून वारंवार डिझेल दरवाढ होत आहे. २०२०-२१ च्या ऊस वाहतुकीचा फरक वाहतूकदारांना मिळावा, तसेच २०२१-२२ च्या वाहतुकीसाठी देखील दरवाढ मिळावी ही मागणी ऊस वाहतूकदारांकडून करण्यात आली. त्याचबरोबर मागील वर्षाचा फरक कमिशनसहित मिळावा, ट्रॅक्टर गाडीप्रमाणे गटातील वाहतूक मिळावी, टी. डी. एस. कपात करू नये व गेटकेनसाठी पन्नास टक्के वाहतूक वाढ मिळावी, कारखाना सुरू होताना डिझेलचा जो दर आहे त्या दराने कारखाना बंद होईपर्यंत डिझेल मिळावे अथवा त्या पटीत दरवाढ मिळावी, गेटकेनची वाहतूक गावच्या प्लॉटनुसार मिळावी व वाटखर्चीमध्ये वाढ मिळावी अशा आदी मागण्या घेऊन माळेगाव कारखाना क्षेत्रातील मेखळी ,घाडगेवाडी,निरावागज,खांडज,शिरवली,माळेगाव,पणदरे व धुमाळवाडी या गावांतील ऊस वाहतूकदारांनी आपल्या मागण्यांचे निवेदन कारखाना प्रशासनाला दिले. या वेळी मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूकदार उपस्थित होते.
...अन्यथा ऊस
वाहतूकदारांमार्फत आंदोलन
वारंवार डिझेल दरवाढ होत असून, सध्याच्या दराने ऊस वाहतूक करणे परवडत नाही. त्यामुळे माळेगाव कारखान्याकडून सन २०२०-२१ च्या ऊस वाहतुकीचा फरक कमिशन सहित मिळावा . २०२१-२२ या हंगामासाठी ऊस वाहतूक दरवाढ मिळावी. यासाठी मागण्यांचे निवेदन दिले आहे. पुढील आठ दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास ऊस वाहतूकदारांमार्फत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ऊस वाहतूकदार सागर लालासो देवकाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.
ऊस वाहतूक दरवाढ मिळावी म्हणून वाहतूकदारांचे माळेगाव कारखाना प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
२३०६२०२१-बारामती-२३