(स्टार ८८१ डमी)
पुणे : वर्षभरापासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. वाहतुकीचा खर्च वाढत असल्याने त्यामुळे शेतमालाची वाहतूक करणाऱ्या चालकांनी दर वाढवले आहेत. परिणामी बाजारात भाजीपाल्याचे दरात वाढ झाली आहे. सोबतीला खाद्यतेलाचे दर ३०-४० रुपयांनी वाढल्याने घराघरांतील किचन कोलमडले आहे. गृहिणींना आता घर चालवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
वर्षभरापासून कोरोना प्रादुर्भावामुळे शहर आणि जिल्ह्यात निर्बंध लावले जात आहेत. त्यामुळे बाजारात मागणी जास्त आहे; पण त्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे खाद्य तेल, किराणामाल तसेच भाजीपाल्याचे दर सातत्याने वाढत होत आहे. मात्र, याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होत आहे. कोरोना महामारीमुळे रोजगार गेल्याने आधीच हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. त्यातच सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे गृहिणींना घर चालवण्यासाठी प्रचंड आटापिटा करावा लागत आहे.
----
ट्रॅक्टर शेतीही महागली...
डिझेलच्या भावात मागील काही महिन्यांत सातत्याने वाढ होत आहे. सध्या डिझेल प्रतिलिटर ९५ रुपये झाले आहे. त्यामुळे ट्रॅक्टर चालकांनी शेतीच्या मशागतीचे दर वाढवले आहेत. पूर्वी एका एकराला २०००-२५०० रुपये दर होते. ते आता २५००-३२०० रुपयांपर्यंत वाढवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता ट्रॅक्टर शेती परवडत नाही.
-----
भाजीपाल्याची दर (प्रतिकिलो)
* टोमॅटो :- ६०
* शेवगा :- ४०
* मटार :- ७०
* वांगे :- ३५
* बटाटे :- २०
----
पत्ता कोबी ६० रुपये किलो
कोरोना निर्बंध आणि जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शेतमाल खराब झाला. त्यामुळे पालेभाज्या आणि फळभाज्यांची बाजारातील आवक मंदावली आहे. त्यामुळे इतर पालेभाज्याप्रमाणे पत्ता कोबीचे प्रतिकिलोचे भाव ६० किलो झाले आहेत.
----
डाळ स्वस्त; तेल महाग...
* मागील काही महिन्यांत डाळींचे भाव कमी झाले आहेत. सध्या डाळींचे भाव प्रतिकिलो ८०-९० रुपये आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळत आहे.
* मात्र, खाद्यतेलांच्या भावात ३०-४० रुपयांनी प्रतिकिलो मागे वाढले आहेत. सध्या १४० ते १८० रुपये प्रतिकिलो दर झाले आहेत. त्यामुळे गृहिणींची प्रचंड कसरत सुरू आहे.
----
घर चालवणे झाले कठीण...
१) कोरोनामुळे आधीच रोजगारावर गदा आली आहे. त्यातच आता दिवसेंदिवस खाद्यतेलाचे भाव सातत्याने वाढत आहे. त्यामुळे घरसंसार चालवताना कठीण होत आहे.
- संगीता कांबळे, गृहिणी
---
२) गेल्या तीन-चार महिन्यांत तेलाच्या भावात प्रतिलिटर मागे ३०-४० रुपये वाढले आहेत. गरिबांनी घरखर्च कसा चालवायचा. सरकारने खाद्यतेलाचे दरवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी पावले उचलायला हवी.
- अर्चना भोसुरे, गृहिणी
-----
व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया
१) कोरोनामुळे सातत्याने निर्बंध लावले जात आहेत. त्यामुळे खाद्यतेल, किराणामालाचा पुरवठा विस्कळीत होत आहे. त्याचा परिणाम खाद्यतेलाचे भाव वाढत आहेत.
- रमेश लाहोटी, व्यापारी
---
२) जून महिन्यात झालेल्या पावसाने भाजीपाला शेतात सडून गेला. त्यामुळे बाजारातील आवक एकदम कमी झाली. मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळे शेतमालाच्या भावात वाढ झाली आहे.
- संदीप दरेकर, व्यापारी
----
पेट्रोल-डिझेलचे दर
वर्षे पेट्रोल डिझेल
जानेवारी २०१८ ७७.८७ ६८.१५
जानेवारी २०१९ ७६.६३ ६७.७५
जानेवारी २०२० ८१.४० ७५.७१
जानेवारी २०२१ ९२.५२ ८१.७२
फेब्रुवारी २०२१ ९७.१९ ८६.८८
मार्च २०२१ ९६.६० ८६.७१
एप्रिल २०२१ ९६.४५ ८६.३९
मे २०२१ १००.१५ ९०.७२
जून २०२१ १०४.५४ ९४.९४
जुलै २०२१ १०५.२१ ९५.०७