पुणे : आज संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवड मुक्कामी आहे. दिवेघाटाची खडतर वाट ओलांडून माऊलीची पालखी सासवडमध्ये पोहचली आहे. दोन दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडच्या दिशेने रवाना झाली होती. यावेळी पावसामुळे वारकऱ्यांचा उत्साह वाढला होता. तसेच स्थानिक नागरिकांनीही माऊलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
माऊलींच्या दर्शनासाठी खासदार सुप्रिया सुळेही आल्या होत्या. दिवे घाटात दर्शन घेतल्यानंतर सुप्रिया ताईंना फुगडी खेळण्याचा मोह आवरता आला नाही. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सुप्रिया सुळेंचा फुगडीचा व्हिडिओ-
पालखी मार्गावरील अवघड समजला जाणारा दिवे घाट लाखो वारकऱ्यांनी अगदी सहजरित्या पार केला. यावेळी वरुणराजाच्या हजेरीमुळे वारकऱ्यांचा उत्साह दुणावला होता. निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला दिवेघाट, तिथून वाट काढत विठुरायाच्या दर्शनाला निघालेला वारकरी आनंदात दिसत होता.
आळंदी ते पंढरपूर या प्रवासातील पुणे ते सासवड हा सर्वाधिक अंतराचा टप्पा माऊलीच्या पालखीने आज पार केला.