धनकवडी : व्याजाच्या पैशातून सपासप वार करून खून करणाऱ्या फरार आरोपींना बीड जिल्ह्यातील माजलगाव मधून ताब्यात घेण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश मिळाले असून प्रकाश शिंदे व किसन उफाडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शनिवारी रात्री उशिरा दोघांना ही सापळा रचून ताब्यात घेतले असून आज पुण्यात आणले आहे.
कर्जाऊ दिलेल्या पैशाचे व्याज न दिल्याने झालेल्या वादातून दोघांनी धारदार हत्याराने सपासप वार करत शरद शिवाजी आवारे, याचा खून केला होता. हा प्रकार कात्रज सिंहगड रोड दरम्यानच्या नवले पुलाजवळील सेवा रस्तावर २८ नोव्हेंबरला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला होता. या प्रकरणी त्याचा मित्र प्रशांत महादेव कदम, (वय ३७ वर्षे, रा. धनकवडी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
शरद आवारे यांनी प्रकाश शिंदे याच्याकडून व्याजाने एक लाख रुपये घेतले होते. त्याचे व्याज शरद दर महिन्याला तो देत होता. मात्र नोव्हेंबर महिन्यात त्याने व्याज दिले नाही. त्यामुळे प्रकाश शिंदे याने शरद आवारे याला कात्रज रोडवरील चंद्रसखा वेअरहाऊस जवळ बोलावले होते. तेथे त्यांच्यात पैशावरुन वादविवाद झाला. तेव्हा चिडलेल्या प्रकाश शिंदे व त्याच्या साथीदाराने धारदार हत्याराने शरद याच्यावर सपासप वार केले व पळून गेले होते. आरोपींच्या शोधासाठी भारती विद्यापीठ आणि गुन्हे शाखेची पथके रवाना झाली होती.
दरम्यान भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक या दोघांचा शोध घेत असताना तपास पथकातील आधिकारी व कर्मचाऱ्यांना दोघेही बिड जिल्ह्यातील माजलगाव येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अभिजित जाधव, विक्रम सावंत व राहुल तांबे यांनी सापळा रचून बीड माजलगाव येथून दोघांनाही ताब्यात घेतले असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर करत आहेत.