पुणे : शहरातील गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करताना मागील तीन वर्षात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा (मोक्का) वापर केला गेला. मात्र, या टोळ्यांमधील काही गुन्हेगार फरार झाले आहेत. अशा आरोपींच्या शोधासाठी आता गुन्हे शाखेने मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी आरोपीचे नातेवाईक, जामीनदारांकडे चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे फरारींच्या पूर्वीच्या गुन्ह्यात जामीनदार राहिलेल्यांना घोर लागला आहे.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी गेल्या तीन वर्षात २२६ संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कारवाई केली. त्यांच्यावर दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले, तरीही त्यातील तब्बल १९१ गुन्हेगार फरारी आहेत. त्यामुळे आता या गुन्हेगारांच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्या पूर्वीच्या गुन्ह्यात त्यांच्या जामीनदाराचा शोध घेण्यात येणार आहे. जामीनदाराला माहिती दिली जाणार आहे. तसेच त्याच्याकडे चौकशी केली जाणार आहे. आरोपीच्या नातेवाइकांकडेही चौकशी करून त्यांच्याकडून आरोपीविषयीची माहिती (डोजीयर) भरून घेण्यात येणार आहे.
तर मालमत्ता होणार जप्त
न्यायालयाच्या मार्फत मोक्कातील फरारी आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. फरारी १९१ आरोपींच्या बाबत ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे फरारी आरोपींची मालमत्ता जप्त होऊ शकते.
स्टँडिंग वॉरंटची अंमलबजावणी
फरारी आरोपीच्या शोधासाठी पोलिस सुरुवातीला समन्स, त्यानंतर जामीनपात्र वॉरंट काढले जाते, तरीही तो हजर झाला नाही तर अजामीनपात्र वॉरंट काढले जाते. तरीही आरोपी मिळून आला नाही, तर पोलिस शेवटी स्टॅंडिंग वॉरंट काढतात. आरोपी सापडेपर्यंत त्यांची मुदत असते. त्यामुळे पोलिस मोक्कातील फरारी आरोपींना शोधण्यासाठी स्टॅंडिंग वॉरंट काढणार आहेत.
मागील तीन वर्षांच्या कालावधीत मोक्कातील १९१ आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांना अटक करण्यासाठी गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम हाती घेतली आहे. मालमत्ता जप्ती, जामीनदार, नातेवाइकांची माहिती संकलित केली जात आहे. तसेच त्यांच्यासाठी स्टॅंडिंग वॉरंटही लवकरच जारी केले जाणार आहे.
शैलेश बलकवडे, अपर पोलिस आयुक्त गुन्हे शाखा