व्हाॅट्सअॅप स्टेटसच्या वादातून मंचर येथे सराईत गुन्हेगार ओंकार ऊर्फ राण्या बाणखेले याचा खून करण्यात आला होता. खुनाच्या घटनेनंतर पवन थोरात हा आरोपी फरार झाला होता. फरार असलेला आरोपी तसेच खेड पोलीस ठाण्यात पप्पू वाडेकर याच्या खुनाचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असलेला पवन सुधीर थोरात (वय २२, रा. जुना चांडोली रोड, मंचर, ता. आंबेगाव) हा मंचर परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. त्यांच्या पथकाला मंचर येथील एसटी बसस्थानक परिसरात एक जण संशयितरीत्या फिरताना आढळला. सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस जवान हनुमंत पासलकर, विक्रम तापकीर, दीपक साबळे, राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, दगडू वीरकर या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील तपासासाठी मंचर पोलिसांकडे सुपूर्त केले आहे.
सदर आरोपीवर ओतूर पोलीस ठाणे, नारायणगाव पोलीस ठाणे, चोपडा जि. जळगाव पोलीस ठाणे, खेड पोलीस ठाणे व मंचर पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे करत आहेत.