पुणे : पूर्ववैमनस्यातून दहा जणांच्या टाेळक्याने तीक्ष्ण हत्याराने वार करीत दाेघांचा खून केला हाेता. याप्रकरणात मागील चार दिवसांपासून फरार असलेल्या सात आराेपींना येरवडा पाेलिसांनी अटक केली आणि एका बालकास ताब्यात घेतले.
शिवशंकर अंजनकुमार हरगुडे (वय २०), साहिल राम कांबळे (वय २०), कृष्णा राजू पवार (वय २३), निशांत तायप्पा चलवादी (वय २०), राेहित परशुराम सणके (वय २१) , गाैरव उर्फ साहिल रवी चव्हाण (वय २०), साेनू शंकर राठाेड (वय २३, सर्व रा. येरवडा) यांना अटक केली. तसेच एका बालकाला ताब्यात घेतले आहे. यापूर्वी शंकर मानू चव्हाण (वय ५४), बादल शंकर चव्हाण (वय २५, दाेघे रा. पांडू लमाण वस्ती, येरवडा) यांना अटक करण्यात आली आहे. सुभाष किसन राठाेड (वय ४० ) आणि अनिल उर्फ पाेपट भीमराव वाल्हेकर ( वय ३५, रा. पांडू लमाण वस्ती, येरवडा) अशी खून झालेल्या दाेघांची नावे आहेत.
फिर्यादी लक्ष्मण किसन राठाेड हे त्यांचा भाऊ सुभाष आणि अनिल वाल्हेकर याच्यासह शनिवारी दि. १२ राेजी पहाटे दुचाकीवरून जात असताना दहा ते अकरा आराेपींच्या टाेळक्याने त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. त्यामध्ये सुभाष राठाेड आणि अनिल वाल्हेकर यांचा मृत्यू झाला आणि फिर्यादी जखमी झाले हाेते. यातील मुख्य गुन्हेगारांना शनिवारी अटक केली हाेती. मात्र, उर्वरित आराेपी फरार हाेते. ते वाघाेलीतील वाघेश्वर मंदिराच्या पाठीमागे असलेल्या माळरानात लपून बसल्याची माहिती येरवडा तपास पथकातील उपनिरीक्षक अंकुश डाेंबाळे आणि हवालदार दत्ता शिंदे यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे निरीक्षक उत्तम चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील प्रदीप सुर्वे, संदीप राऊत, गणपत थिकाेळे, तुषार खराडे, अमजद शेख, कैलास डुकरे, किरण घुटे, सागर जगदाळे आदींच्या पथकाने आराेपींना सापळा रचून अटक केली.