लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दोन वर्षांपूर्वी व्याजाच्या पैशांच्या वादातून कोथरूडमधून एकाचे अपहरण करून पौडला नेऊन तेथे खून केल्या प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला खंडणीविरोधी पथकाने मुंबईत पकडून अटक केली.
योगेश ऊर्फ पप्पू प्रकाश दाभाडे (सध्या रा. शेल कॉलनी, चेंबूर, मुंबई, मूळ रा. दखणे, ता. मुळशी, जि. पुणे) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. पोलीस चकमकीत मारला गेलेला तळेगाव दाभाडे परिसरातील गुंड श्याम दाभाडे याचा योगेश दाभाडे साथीदार आहे. दाभाडेचा मित्र विशाल देसाईने मयूर भागवतला व्याजाने पैसे दिले होते. व्याजाने दिलेल्या पैशांच्या वादातून दाभाडे, साथीदार देसाई, सूरज ढोकळे, अंकुश गोणते यांनी भागवतचे कोथरूड भागातून अपहरण केले. त्यानंतर त्याला पौड परिसरात नेले. त्याचा खून करून आरोपी पसार झाले. या प्रकरणात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती.
दाभाडेचे साथीदार पकडले गेले. मात्र, त्याचा शोध लागत नव्हता. तो मुंबईत नाव बदलून वास्तव्य करत असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकातील पोलीस नाईक राजेंद्र लांडगे, नितीन रावळ यांना मिळाली. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहायक निरीक्षक संदीप बुवा, नितीन कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, विवेक जाधव, अमर पवार, रमेश चौधर, संजय भापकर, ॠषीकेश महल्ले आदींनी सापळा लावून दाभाडेला चेंबूर परिसरात पकडले.