याप्रकरणी अंकुश माणिक गायकवाड (वय ५८, रा खडकी, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके, उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार विजय कांचन, धिरज जाधव, दगडू विरकर हे रेकॉर्डवरील फरार आरोपींचा शोध घेत होते. यावेळी १९८० मध्ये ९ जणांनी दरोडा टाकून सोने व रोख रक्कम घेऊन गेले होते. यांतील ६ जणांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे, तर या गुन्ह्यातील अंकुश गायकवाडसह ३ जण जवळपास ४१ वर्षांपासून फरार होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गायकवाड हा करमाळा खडकी रस्त्यावर जनावरे चरायला घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले आहे. दरोड्याच्या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने वरील गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. यावरून त्यास पुढील तपासाकरिता यवत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने केली आहे.
लोणीकाळभोरला ४१ वर्षांपासून फरारी दरोडेखोर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 4:16 AM