पुणे : मोक्का गुन्ह्यातील फरार गुन्हेगार शुभम कामठे याला लोणी काळभोर पोलिसांनी पिस्तुलासह जेरबंद केले.
शुभम कैलास कामठे (वय २६, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) याच्यावर लोणी काळभोर व हडपसर पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, गर्दी, मारामारी अशा स्वरूपाचे ११ गुन्हे दाखल आहेत.
शुभम कामठे हा जवळपास अडीच वर्षे येरवडा कारागृहात होता. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे त्याला ऑगस्ट २०२० मध्ये जामीन मिळाला होता. त्यावेळी सुमारे १५० हून अधिक समर्थकांनी येरवडा कारागृहापासून त्याची रॅली काढली होती. त्याच्या समर्थकांनी संपूर्ण सोलापूर रोड अडविला होता. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो फरार होता.
हडपसर येथे एका जण एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेला असताना त्याला शुभम कामठे व त्याच्या साथीदारांनी मारहाण करुन लुटले होते. त्यानंतर हडपसर पोलिसांनी त्याच्यावर मोक्का कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्याच्यासह टोळीवर एप्रिलमध्ये मोक्का कारवाई केली होती.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पोलीस अंमलदार अमित साळुंखे, निखिल पवार यांना शुभम कामठे हा सोरतापवाडी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आज पहाटे सापळा रचला. शुभम हा सोरतापवाडी येथील गोल्डग ड्रिस लॉजचे समोर आला. त्याला पोलिसांची चाहुल लागताच तो पळून जाऊ लागला. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करून काही अंतरावर त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्तूल व दोन काडतुसे आढळून आली.
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्ष सुभाष काळे तसेच तपास पथकातील सहायक निरीक्षक राजू महानोर, दादाराजे पवार, अमित गोरे, नितीन गायकवाड, गणेश सातपुते, अमिम साळुंके, श्रीनाथ जाधव, सुनील नागलोत, राजेश दराडे, दिगंबर साळुंके, बाजीराव वीर, निखिल पवार, शैलेश कुदळे, रोहिदास पारखे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.