अतुल चिंचलीपुणे : अग्नी हे ज्ञानाचे प्रतीक आहे. ज्ञानाची उपासना म्हणजेच अग्निची किंवा सूर्याची उपासना होय. सूर्यनमस्काराचे मंत्र उच्चारून आपल्या क्षमतेनुसार सूर्यनमस्कार करावेत. त्यामुळे आपल्याला हाडांचे आजारही होत नाहीत. आरोग्यही उत्तम राहते. असा सल्ला योगगुरू, संस्कृततज्ज्ञ आणि डॉक्टरांनी दिला आहे. सूर्यनमस्कार दिनानिमित्त ‘लोकमत’ने तज्ज्ञांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस मानला जातो. पूर्वी सूर्याला देव मानले जात होते. त्यामुळे अग्नीची यज्ञात आहुती देऊन उपासना केली जात. रथसप्तमी सूर्यजन्माचा दिवस आहे, असा उल्लेख पुराणात सापडतो. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनमस्कार दिन साजरा केला जातो. सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. सर्व यौगिक अभ्यासासाठी सूर्योदयाची वेळ सर्वोत्तम मानली गेली आहे. त्याचप्रमाणे सूर्यनमस्कारसुद्धा सूर्योदयाच्या समयी घालणे योग्य आहे. ...........ऋग्वेदाने अग्निची उपासना सांगितली आहे. ज्ञानाची उपासना हीच अग्निची उपासना हा आर्य धर्माने जगाला दिलेला संदेश आहे. त्यामुळे आपला भारत जगद्गुरू होणार अशी विवेकानंदांची भविष्यवाणी आहे. आपण गायत्री मंत्राने सूर्यनमस्काराला सुरुवात करावी. ‘मी आकाशातील सूर्यनारायणाच्या तेजाचे संपूर्ण ध्यान करतो. देवाने दिलेल्या बुद्धीला क्रियाशील ठेवण्याचे काम अग्निदेव करतो’, असा गायत्री मंत्राचा अर्थ आहे. गायत्री मंत्राचा जप करून सूर्याची बारा नावे घेत नमस्कार करावेत. कमीत कमी बारा सूर्यनमस्कार उपासनेसहित करावेत. सर्वांनी सूर्याची उपासना या मार्गाने करावी. - पंडित वसंत गाडगीळ, संस्थापक अध्यक्ष, शारदा ज्ञानपीठ...........आपण क्षमतेनुसार सूर्यनमस्कार करावेत. दोन प्रकारे सूर्यनमस्कार केले जातात. आपली क्षमता ओलांडून, मोजून सूर्यनमस्कार घातले जातात. पण या मंत्रांचा अर्थ लावून त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करत सूर्यनमस्कार करावेत. त्यामुळे मन शांत होते. तणावापासून मुक्ती मिळते. सूर्यनमस्कारामुळे समाधान, शांती, आनंद, आणि प्रसन्नता मिळते. ही शारीरिक हालचालीतून मिळणाऱ्या तंदुरुस्तीपेक्षा अधिक पटीने महत्त्वाची आहे. दमछाक न करता शांतपणे सूर्यनमस्कार केले तर त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. सूर्य हा सृष्टीला जिवंत ठेवणारी ऊर्जा आहे. सकाळी उठल्यावर सूर्यासमोर उभे राहून सूर्यनमस्कार करावेत. - डॉ. संप्रसाद विनोद, योगगुरू...........सूर्यनमस्काराच्या बारा अवस्था आहेत. ज्या शरीर मजबुतीसाठी खूप मदत करतात. पाठीच्या समस्या रोखण्यात हे उपयुक्त आहेत. प्रत्येक अवस्था स्नायूंना प्रभावित करते. त्यामुळे स्नायूंना ताकद मिळते. जी लोक बसून काम करतात. त्यांना पाठीचे विकार उद्भवू लागतात. तसेच हालचाल नसल्याने गुडघे, पाठ, मान, कंबर, पोट यातले काही दुखण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. सूर्यनमस्कार या तक्रारींपासून दूर ठेवण्यासाठी प्रभावी मार्गाने मदत करतात. स्थूलपणा, हृदयविकार, मधुमेह व उच्च रक्तदाब या सर्व आजारांपासून बचाव करण्यासाठी सूर्यनमस्कारांचा व्यायाम मदत करतो.- डॉ. मनीष कुलकर्णी, अस्थीरोगतज्ज्ञ, धन्वंतरी हॉस्पिटल
सूर्यनमस्काराने शरीराचा सर्वांगीण विकास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 11:30 AM
सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम..
ठळक मुद्देरथसप्तमीला सूर्यनमस्कार दिन होतो साजरा रथसप्तमी सूर्यजन्माचा दिवस आहे, असा उल्लेख पुराणात सूर्यनमस्कारामुळे समाधान, शांती, आनंद, आणि प्रसन्नता