पुणे : उत्तर प्रदेश येथील लखीमपुरची (lakhimpur) घटनेबाबत आज संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीने महाराष्टर बंद ची हाक दिली आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जनतेला केले होते. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जिल्ह्यात महाराष्ट्र बंद ला संमिश्र प्रतिसाद असल्याचे चित्र दिसून येत आहे. पुण्यातही मार्केटयार्ड, व्यापारी महासंघ यांनी बंद पूर्णतः पाठिंबा दिला आहे.
उत्तर प्रदेश येथील लखीमपुरची घटना दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांविरोधातील ही घटना अत्यंत खेदजनक आहे. पुणे व्यापारी महासंघ पूर्णत: या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा आहेत. (mahavikas aghadi) महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये पुणे व्यापारी महासंघ सहभागी होणार असल्याचे कालच व्यापाऱ्यांनी जाहीर केले होते.
पुणे शहारत मध्यवर्ती भागात असणारी दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र रस्त्यावर गर्दी दिसून येत आहे तर उपनगरात पौड फाटा, कर्वे रोड येथील सर्व दुकाने बंद आहेत. परंतु रहदारी मात्र सुरु असल्याचे चित्र दिसून आले आहे. बाणेर - बालेवाडी - पाषाण, सुतारवाडी मध्ये बंदला प्रतिसाद देत अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. कोथरूड कर्वेनगर मध्ये बंदला समिश्र प्रतिसाद आहे. रिक्षा सेवा चालू असून तुरळक बस रस्त्यावर दिसत आहे. मात्र बसस्थानकावर नागरिकांची गर्दी पहायला मिळत आहे. हडपसर येथे भाजीमार्केटमध्ये कडकईत बंद असल्याचे चित्र दिसून आले आहे.