पुणे : न्यायाधीश आणि तज्ज्ञ सदस्यांच्या नियुक्तीअभावी गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ बंद असलेले ‘राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणा’चे (एनजीटी) पश्चिम खंडपीठ (पुणे बेंच) येत्या १ एप्रिलपासून सुरू होणार आहे, अशी माहिती देणारे पत्रक एनजीटी मुख्य न्यायपीठाच्या उपकुलसचिवांनी काढले आहे. यात त्यांनी न्यायमूर्ती शिवकुमार सिंग यांची न्यायाधीशपदी नियुक्ती केली असून आणि सिद्धार्थ दास हे यापुढील काळात एनजीटीचे तज्ज्ञ सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या ६५० याचिकांवर जलद गतीने सुनावणी होईल. ‘एनजीटी’च्या मुख्य न्यायपीठाच्या उपकुलसचिव डॉ. सुखदा प्रीतम यांनी नियुक्तीबाबतचे अधिकृत परिपत्रक बुधवारी प्रसिद्ध केले आहे. त्यात पुणे एनजीटीत तज्ज्ञ सदस्य म्हणून सिद्धांत दास यांची निवड केली आहे. न्यायाधीशांची नियुक्ती झाल्यानंतर पुण्यातील एनजीटी फेब्रुवारीपासून पूर्ण क्षमतेने कार्यरत होणार असल्याची चर्चा होती. यावर अखेर प्रशासनाकडून पदनियुक्ती करून त्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. कामकाज जलद गतीने सुरू व्हावे, यासाठी सातत्याने एनजीटी बार असोसिएशनकडून पाठपुरावा केला जात होता. मात्र, एनजीटीच्या पुण्यासह सर्व विभागीय खंडपीठांमध्ये न्यायाधीश आणि तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामुळे देशभरातील पाचही खंडपीठांचे काम दोन वर्षांपासून मंदावले होते. दिल्लीच्या मुख्य न्यायपीठासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आठवड्यातून दोन दिवस सुनावणी सुरू होती. मात्र, त्यातून काहीच साध्य होत नसल्याचा दावा वकील आणि पक्षकारांनी केला होता.
पुण्यातील ‘ राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणा’चे कामकाज एक एप्रिलपासून होणार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 4:43 PM
गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या ६५० याचिकांवर जलद गतीने सुनावणी
ठळक मुद्देन्यायमूर्ती शिवकुमार सिंग यांची न्यायाधीशपदी नियुक्ती