पुणे : महाराष्ट्र परिषदेच्या महाराष्ट्रासह इतर राज्यांतही जवळपास ७२ शाखा आहेत. पण यातील बऱ्याच शाखांचा डोलारा निधीअभावी उभा ठेवणे अवघड जात आहे. त्यामुळे शाखांना निधी द्यावा, वर्षात जे ५५ कार्यक्रम परिषद घेते त्यांपैकी काही कार्यक्रम शाखांना द्यावेत व त्यासाठी निधी द्यावा, या व इतर काही मागण्या परिषदेचे पदाधिकारी, विश्वस्त आणि महामंडळच्या सदस्यांच्या नुकत्याच झालेल्या संयुक्त बैठकीत करण्यात आल्या आहेत.परिषदेच्या काही शाखा जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत, तर काही शाखा तालुकास्तरावर आहेत. शहरी भागातील शाखांना कार्यक्रमासाठी निधीची अडचण येत नाही; पण तालुकापातळीवरील शाखांना आर्थिक चणचण भासते. शाखांची नियमित कार्यक्रम करण्याची इच्छा असते; पण निधीअभावी कार्यक्रम घेणे शाखांना शक्य होत नाही. हीच अडचण लक्षात घेऊन सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ यांनी शाखांना निधी मिळण्यासंदर्भात काही प्रस्ताव ठेवले.या संदर्भात ते म्हणाले, साहित्य परिषद वर्षात ५५ कार्यक्रम घेते. ते सर्व कार्यक्रम पुण्यात होतात. यातील काही कार्यक्रम शाखांना द्यावे, अशा कार्यक्रमांसाठी परिषद जो खर्च करते तो निधी शाखांना द्यावा असा प्रस्ताव दिला आहे. काही शाखा नियमित व्याख्यानमाला घेतात; पण वक्त्यांचे मानधन, प्रवासखर्च शाखांना झेपत नाही. त्यामुळे वक्त्याचे मानधन परिषदेने द्यावे, असेही सुचविले आहे. साहित्य परिषदेकडे असलेल्या ८२ लाखांच्या निधीद्वारे मिळणाऱ्या व्याजातून कार्यक्रम घेतले जातात. तोच निधी मिळावा, अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. आजीव सदस्यत्व देताना एक हजार रुपये घेतले जातात. त्यातील ६० टक्के रक्कम परिषद घेते, उरलेली ४० टक्के रक्कम शाखेला परत दिली जाते. ४० टक्क्यांऐवजी ५० टक्के रक्कम मिळावी, यास मंजुरी मिळाली असल्याचे बेडकिहाळ म्हणाले. साहित्य परिषदेतर्फे विभागीय संमेलन घेतले जाते. त्याची जबाबदारी शाखांवर असते. संमेलनासाठी परिषद ५० हजार रुपये देते. पण हा निधी पुरत नाही. त्यामुळे विभागीय संमेलनासाठी १ लाख रुपये द्यावेत, असाही प्रस्ताव या बैठकीत ठेवण्यात आला आहे. परिषदेच्या वेगवेगळ्या शाखांद्वारे शाखा मेळावे घेतले जातात. त्यासाठीही अनुदान द्यावे, अशीही अपेक्षा व्यक्त केली.या बैठकीला विश्वस्त, पदाधिकारी, जिल्हा प्रतिनिधी, कार्यवाह उपस्थित होते. (प्रतिनिधी)
डोलारा सावरण्यास मसाप शाखांना निधी द्या
By admin | Published: July 12, 2016 1:32 AM